Type Here to Get Search Results !

शिवसेनाप्रमुखांनी त्यांच्या शरद बाबूंना लिहिलेलं पत्र सोशल मीडियावर व्हायरल


महाराष्ट्राबरोबरच देशाला आपली गरज असल्याचा केलं होतं स्पष्ट

काँग्रेस, पुलोद आघाडी, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी राजकीय वाटचाल राहिलेले माजी केंद्रीय मंत्री तथा राज्याबरोबर देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचं व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ही राजकीय पटलावरील दोन विरोधी टोकं... विचार भिन्नतेमुळं त्यांच्या  राजकीय भूमिका दक्षिण आणि उत्तर ध्रुवा सारख्या ... मात्र प्रारंभीच्या काळात ' झेंडे ' वेगळे होते. सीमावर्ती भागातील मराठी माणसांच्या प्रश्नांसाठी एका विचारपीठावर खांद्याला खांदा लावून बसलेली ही व्यक्तिमत्व ... त्यांच्या राजकीय भूमिका विरोधी असल्या तरी त्यांची वैयक्तिक आयुष्यातील जवळीकता आणि मैत्री आजच्या राजकीय पटलावर दिशादर्शक म्हणावी लागेल. त्यांच्यातील हा पहिला सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पत्रानं पुढं आलाय.

शिवसेनेची भाजपाशी युती झाल्यावर पुन्हा राजकीय पटलावर अंतर वाढल्याचे वरकरणी दिसून येते. हे नेते त्यांच्या-त्यांच्या राजकीय भूमिकेशी प्रामाणिक होते.  उभयतांमध्ये टोकाचा राजकीय विरोध असला तरी त्यांची मैत्री ही तितकीच जवळची होती, हे शिवसेनाप्रमुखांच्या त्या पत्रानं पुन्हा सामान्यांपुढं आणलंय.

१९९५ च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यावर शिवसेना प्लस भाजपा प्लस अपक्षांचं सरकार शिवशाहीच्या नावानं सत्तास्थानी विराजमान झालं, १९९९  मध्ये विधानसभा निवडणुकाला महाराष्ट्र पुन्हा सामोरा जात असताना, अगदी एके-47 चालावी, तद्वत आरोपांच्या फैरी झडल्या. त्या निवडणुकीच्या शिवसेनाप्रमुखांनी ' मैद्याचं पोतं ' असा केलेला उल्लेख ज्यांच्यासाठी केला, ते विसरले असतील, मात्र महाराष्ट्राच्या राजकीय सारीपाटावर कटाक्ष असणारा सामान्य माणूस विसरणार नाही.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिका आणि केलेली वक्तव्य यात कधीच तडजोड केली नाही. ' जो बोला, मैं बोला ' अशी त्यांची रोखठोक भूमिका राहिली. २००६ मधील नोव्हेंबर ची १५ तारीख ! याच तारखेला शिवसेना प्रमुखांनी त्यांच्या शरदबाबू ला लिहिलेलं पत्र हल्ली सामाजिक माध्यमावर प्रचंड चर्चेत आहे. 

राजकीय पटलावर पक्ष-संघटना वेगळ्या, भूमिका वेगळ्या असल्या तरी आपल्या राजकीय विरोधकाला आणि व्यक्तिगत जीवनातील चांगल्या मित्राला शिवसेनाप्रमुखांनी त्यांच्याच शैलीत प्रकृतीची काळजी घेण्याचा अनाहूत सल्ला शरदबाबूंना दिला होता, राजकीय पटलावर कोणाशी कितीही हाडवैर असलं तरी वैयक्तिक जीवनात मैत्री किती जवळची असू शकते, हे ते पत्रं दाखवून देतंय.

ते पत्र शरदचंद्र पवार केंद्र सरकारमध्ये कृषी अर्थ व नागरी पुरवठा मंत्री असताना, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते, त्या संकटातून ते पुढे आले. त्याचवेळी शिवसेनाप्रमुखांनी त्यांच्या शरद बाबूंना पत्र पाठवून प्रकृतीची काळजी घेण्याबरोबरच आपली महाराष्ट्राला व देशाला किती गरज आहे, हे एक वडिलधाऱ्या आदेशानं आपल्या मित्राला कळविलं होतं.



अपसात राजकीय पक्ष वेगळा, विचार वेगळे असले तरी आपल्या खाजगी जीवनात राजकारण आड येऊ न देणारे हे राज्यातील ज्येष्ठ नेते ! त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातील मैत्रीचे बंध आपसूकच सर्वांसमोर येतात, त्या पत्रातील मजकूर जसा होता, तसा...


                                              १५ नोव्हेंबर, २००६


आदरणीय शरदचंद्रजी पवार

कृषी, अर्थ व नागरी पुरवठा मंत्री, 

हिन्दूस्थान सरकार, नवी दिल्ली

प्रिय शरदबाबू यांसी

जय महाराष्ट्र!

आपण केंद्र शासनात कृषिमंत्री या पदावर विराजमान आहात. तरीपण हे पद बाजूला सारून आपल्याला मी माझे जुने मित्र शरदबाबू या नावानेच विचारणार आणि बोलणार. आपण बरे झालात हे ऐकून बरे वाटलेः परंतु वडीलधाऱ्या अधिकाराने आम्ही आपल्याला आदेश देत आहोत की, यापुढे जरा वणवण कमी करा. झेपेल तेवढे जरूर करा! पण अलीकडे आपला दौऱ्यावर जाण्याचा सुकाळ झाला होता. वाकड्या तिकड्या मार्गाने आपण दौरे करीत होता, परदेश दौऱ्यातही कोठे कमतरता नव्हती. आपल्या पक्षाची निशाणी जरी घड्याळ असली तरी आणि त्या घड्याळाचे काटे जरी स्थिरावले असले तरी आपल्या आयुष्याचे घड्याळ टिक टिक करीत त्याचे काटे पुढे सरकतच असतात, हे विसरू नये.

सोनियाच्या 'कथली' राजवटीत आपण अन्न व शेती मंत्री आहात, सध्याच्या परिस्थितीत हे महत्त्वाचे खाते आपण सांभाळीत आहात. त्यामुळे फक्त महाराष्ट्राला नव्हे तर देशाला आपली गरज आहे. पुन्हा बजावतो, महाराष्ट्राला तर आपली नक्कीच गरज आहे; परंतु देशाची भयानक अवस्था पाहिल्यावर आपल्यासारख्याची देशाला नितांत गरज आहे. त्यामुळे स्वतःसाठी नसले तरी महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी तुम्हाला जगावेच लागेल. त्याप्रमाणे वागणूक ठेवावी व प्रकृतीची काळजी घ्यावी.


कळावे,

आपला नम्र,

बाळ ठाकरे 

(बाळ ठाकरे) शिवसेनाप्रमुख


ताजा कलम: आपण घरी आल्यावर हितचिंतकांच्या झुंडीच्या झुंडी आपल्या दारावर आदळतील, त्यांना आवर घालावा।