Type Here to Get Search Results !

तू पारध्याची... आता गाडी तुझ्या नावावर करून देत नाही, असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ; गुन्हा दाखल

                                                    (प्रतिकात्मक छायाचित्र)

सोलापूर : सेकंड हॅंड गाडी खरेदी केल्यावर त्याची कागदपत्रे मागण्यासाठी गेलेल्या तरुणीस दुकानदाराने, तू पारध्याची... आता तुझी गाडी तुझ्या नावावर करून देत नाही, असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ केलीय. ही घटना शिंदे चौकात, २३ मार्च च्या दुपारी ०१ वा. च्या सुमारास घडलीय. याप्रकरणी दाखल फिर्यादीनुसार फौजदार चावडी पोलिसांनी वैभव पावले (रा-शिंदे चौक, सोलापूर) याच्याविरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, पंढरपूर तालुक्यातील तारापूर येथील मयुरी नावाच्या तरुणीने शिंदे चौकातील श्री साई ऑटो कन्सल्टंट या दुकानाचा मालक वैभव पावले याच्याकडून दुचाकी खरेदी केली होती, मात्र कागदपत्राअभावी ते वाहन तिच्या नावे नोंद करण्याचे काम अपूर्ण राहिले होते.

मयुरी कागदपत्रे घेण्याच्या उद्देशाने दुकानात गेली होती. तिने दुकानाचे मालक वैभव पावले यांच्याकडे कागदपत्राची मागणी केली असता,पावले याने तू इथे कशाला आली, जास्त बोलू नको असे म्हणून त्याने त्याच्या डावे हाताने तिचा उजवा हात पकडून रागात तिच्या गालावर दोन चापटा मारून तू पारध्याची ... वगैरे असभ्य शब्दात बोलून जातिवाचक शिवीगाळ करीत ती गाडी तुझ्या नावावर करत नाही, तुला काय करायचं आहे ते कर, असे म्हणून धमकी दिली.

यावेळी पावले यांनी त्याचा जेवणाचा डबा तिच्या दिशेने फेकून मारला. याप्रकरणी तिने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार फौजदार चावडी पोलिसांनी वैभव पावले याच्याविरुद्ध भादवि ३२३,५०९,५०४ सह अनु जाती अनु जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ३ (१) (आर) (एस), ३ (२) (५-अ), प्रमाणे गुन्हा दाखल केलाय. सहाय्यक पोलीस आयुक्त तोरडमल या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.