रमजान महिन्यात शेवटच्या टप्प्यात म्हणजे ईदची नमाज आदा करण्यापूर्वी प्रत्येक व्यक्तिला फितरा द्यावा लागतो. याला सदक ए फित्र म्हणतात. फितरा हा कुटुंबातील सर्व व्यक्तिच्या वतीने दिला जातो. कुटुंबप्रमुख तो आदा करतात. प्रत्येकी पावणे तीन शेर किंवा दोन किलो सहाशे ग्राम गहू किंवा त्याची होणारी किंमत दान दिली जाते.
सदरचे दान हे समाजातील गोरगरीब, गरजू लोक, अनाथाश्रम (यतीमखाना), मदरसातील गरजू मुलांसाठी दिले जाते. कुटुंबातील सर्व सज्ञान व अज्ञान सद्स्यांच्या वतीने कुटुंबाची प्रमुख व्यक्ति हे दान देऊ शकते. अगदी ईदच्या नमाज पूर्वी जन्मलेल्या बाळाच्या वतीने फितरा दान करावा लागतो. कुटुंबातील सर्व व्यक्तिंच्या वतीने हे दान करणे आवश्यक आहे.
जकात ही सर्वांवर बंधनकारक नाही. जे लोक जकात आदा करण्यास पात्र आहेत, ज्यांना साहिबे निसाब म्हटले जाते, त्यांनाच जकात आदा करणे आवश्यक आहे.मात्र फितरा हा सर्वांनी देणे गरजेचे आहे. फितराचा मुख्य उद्देश ईदच्या आनंदात सर्वांना सहभागी होण्याची संधी प्राप्त व्हावी, कुणी ही या आनंदापासून वंचित राहू नये, हा आहे.
फितरा म्हणून गहू, खजूर किंवा बेदाणे किंवा त्याची रक्कम दिली जाते. गहूं देताना आपण दररोज खाण्यासाठी जे वापरतो, तेच दिले पाहिजे. सदक ए फित्र ईदच्या नमाजपूर्वी आदा करणे बंधनकारक आहे. ईदच्या प्रसंगी जकातीच्या रकमेतून विविध प्रकारचे साहित्य मदत म्हणून गरीबांना दान दिले जाते. यात कपडे,रोख रक्कम, खाद्यपदार्थाचे साहित्य आदिंचा समावेश होतो.
काही लोक महिनाभर अशा गरजू लोकांना दररोज मदत करतात. काही लोक एकरकमी मदत करतात, काही कपडे देतात, मात्र कपडे देतांना आपल्या स्वतःसाठी जे पसंत केले असेल त्याच दर्जाचे किंबहुना त्याहून चांगल्या दर्जाचे दिले पाहिजे. रमजान महिना हा एकमेकांचे सुख दुःख जाणून घेऊन गरजूंना सहाय्य करण्याचा महिना आहे.
आपल्याकडून जेवढं सहाय्य समाजातील गरजूंना करता येईल, तेवढं केलं पाहिजे. सुखात तर सर्व सोबत असतात, पण दुःखात व अडचणीच्या काळात एखाद्याच्या पाठीशी उभे राहिले तर त्याला जो आनंद होतो, त्याची गणना होऊ शकत नाही. रमजानला गमख्वारी का महिना म्हणजे सुख- दुःख वाटून घेण्याचा महिना म्हटले जाते ते यासाठीच. एकमेकांना मदत करुन सर्वांच्या दुःखाचा भार हलका करण्याचे कार्य रमजान महिन्यात घडते. जकात व फितराच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये गरजूंना दान म्हणून दिले जाते. दान करण्याची भावना रमजान महिन्यात प्रत्येकाच्या ठायी निर्माण होणे, हे सुध्दा ईश्वराचे मोठे वरदानच आहे. (क्रमशः)
सलीमखान पठाण
9226408082