सोलापूर : मुस्लीम बांधवांनी रमजान पर्वचे तीस निर्जळी उपवास बुधवारी पूर्ण केले. संपूर्ण महिना धार्मिक कार्यासाठी समाजबांधवांनी वाहून दिलेला होता. अधिकाधिक वेळ अल्लाच्या उपासनेसाठी (ईबादत) देण्याचा प्रयत्न केला जात होता. बुधवारी चंद्रदर्शन घडले आणि इस्लामी महिना रमजानची सांगता होऊन ‘’शव्वाल’’ महिन्याला प्रारंभ झाला. या इस्लामी महिन्याच्या १ तारखेला गुरुवारी सकाळी ईद साजरी करण्यात आली. पहाटेपासून मुस्लीम मोहल्ल्यांमध्ये ईदची लगबग दिसून येत होती.
(सोलापूरचे हौशी छायाचित्रकार महेंद्र बाकळे यांनी ड्रोनद्वारा गुरुवारी इदगाह मैदानाचं काढलेलं छायाचित्र/महेंद्र बाकळे 9881082888)
मुस्लिम बांधव ईदच्या दिवशी ईदगाह मैदानात सकाळी विशेष नमाज अदा करतात. हा अत्यंत सौहार्द आणि खुशीचा दिवस मानला जातो. नवीन कपडे परिधान करून सर्वजण एकमेकांना आलिंगन देऊन ईद मुबारक देतात. शिरखुर्मा, गोड पदार्थ करून हिंदू-मुस्लिम बांधवांना आमंत्रित केले जाते.
.....चौकट.....
शिरखुर्म्याचा दरवळला खमंग
ईदचे ‘’शिरखुर्मा’’ हे खाद्यपदार्थ विशेष आकर्षण असते. दूध आणि सुकामेवा एकत्र करुन तयार केले जाणाऱ्या या खाद्यपदार्थाचा तसेच शेवयांचा सुगंध गुरुवारी सकाळी मुस्लीबहुल भागात दरवळलेला जाणवला. ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी घरी येणाऱ्या नातेवाईक, मित्र परिवाराचे शिरखुर्मा देऊन तोंड गोड करण्यात आले.
...चौकट...
आजचा दिवस ईद रुपात दिल्याने अल्लाह चे आभार
अल्लाह ने रमजान महिन्यात संपूर्ण कुरान या जमिनीवर उतरविले. कुरान च्या माध्यमातून समस्त मानव जातीसाठी एकता, भाईचारा व शांततेचं संदेश दिला गेला आहे. आपण नशीबवान आहोत की अल्लाह ने आमच्यासाठी आजचा दिवस ईद च्या माध्यमातून दिला ज्यामुळे कोणीही ना गरीब आहे ना कोणी अमीर;सर्व ईद दिवशी एकाच वेळी एकाच लाईन मध्ये सर्वसमान कोणताही भेदभाव न ठेवता अल्लाह साठी नतमस्तक होतात.जगात शांतता व अखंडता कायम राहो, हीच अल्लाह कडे दुआ ( प्रार्थना)
………
हाफीज सय्यद मोहम्मद
आदिलशाही ईदगाह
जुनी मिल, सोलापूर