सोलापूर : घातक शस्त्राचा वापर करुन दहशत निर्माण करणे, गैरकायद्याची मंडळी जमा करुन दंगा करणे, सामान्य नागरीकांना व व्यापाऱ्यांना दमदाटी करुन त्यांच्याकडून पैसे काढून घेणे, यासारखे गुन्हे दाखल असलेल्या राहुल पांडुरंग पाटील (वय-२५ वर्षे) याला पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे पोलीस आयुक्तालय हद्द, उर्वरित सोलापूर जिल्हा आणि धाराशिव जिल्ह्यातून ०२ वर्षांकरिता तडीपार केलंय.
अक्कलकोट रस्त्यावरील समाधान नगरातील रहिवासी राहुल पांडुरंग पाटील हा सामान्य नागरिकांना शिवीगाळ, मारहाण व दमदाटी करुन गंभीर दुखापत करणे, घातक शस्त्राचा वापर करुन दहशत निर्माण करणे, गैरकायद्याची मंडळी जमा करुन दंगा करणे, सामान्य नागरीकांना व व्यापाऱ्यांना दमदाटी करुन पैसे वसूल करणे अशा स्वरूपाचे सन २०२२, २०२३ व २०२४ या कालावधीमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत.
त्याच्याविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता.
या प्रस्तावाच्या अनुषंगाने पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे यांनी कार्यवाही करुन, त्यांचेकडील तडीपार आदेश क्र. ८५३/२०२४/२६ मार्च २०२४ अन्वये, राहुल पांडुरंग पाटील यास सोलापूर जिल्हा व धाराशीव जिल्हा येथून ०२ वर्षांकरिता ०९ एप्रिल रोजीपासून तडीपार केलं आहे. त्यास तडीपार केल्यानंतर कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील इंडी इथं सोडण्यात आलं आहे.