Type Here to Get Search Results !

रमजानुल मुबारक - ३० अलविदा ... माहे रमजाँ ..



आज सायंकाळी होणाऱ्या चंद्र दर्शनानंतर पवित्र रमजान महिना पूर्णत्वास जाणार आहे. उद्या माहे शव्वालच्या पहिल्या तारखेस ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद साजरी करण्यात येईल.

रमजान महिन्याची आज येणारी शेवटची रात्र ही लैलतुल जायजा अर्थात ईनामप्राप्ती ची रात्र म्हणून खूप महत्वपूर्ण आहे. वर्षभरातील ज्या पाच रात्री महत्त्वाच्या आहेत. त्यापैकी ईदपूर्व रात्र ही एक आहे. आजच्या रात्रीत महिनाभर रमजान महिन्याचे पालन करणाऱ्या भक्तांना अल्लाहतआला इनाम देतात. ज्याप्रमाणे एखाद्या मजूराने काम पूर्ण केल्यानंतर मालकाकडून त्याला मजुरी दिली जाते. त्याप्रमाणे रमजान महिन्याचे पूर्णपणे पालन करणाऱ्या भक्तांना अल्लाहकडून आज रात्री इनाम दिले जाणार आहे. तेव्हा सर्वांनी आजची रात्र सुद्धा नामस्मरण व प्रार्थना करण्यात व्यतीत करावी. 

गेले महिनाभर घराघरातून सर्व वातावरण रमजानमय झालेले होते. सैतान कैद केले गेल्यामुळे सर्व काही सुरळीत चालू होते, परंतु आज चंद्र दर्शनानंतर सैतानही मोकळा होणार आहे. आपण सुद्धा पुन्हा पूर्वीप्रमाणे आपल्या जीवनात रममाण होणार आहोत, परंतु हे जीवन क्षणभंगुर आहे. कोणाचा पत्ता कधी कट होईल, याचा नेम नाही, तेव्हा महिन्याभरामध्ये ज्या चांगल्या गोष्टी आपण आपल्या जीवनात आत्मसात केल्या. त्या पुढे तशाच सुरू ठेवून चांगल्या कर्माची कास धरु या.

रमजान महिन्याचे पालन करताना आपल्याकडून ज्या काही चुका अनावधानाने झाल्या असतील, त्या सर्व चुका अल्लाह माफ करो, आणि सर्वांची प्रार्थना, सर्वांनी केलेले सत्कार्य, दिलेली जकात, खैरात, सदकात कबूल करो आणि रमजान महिन्याच्या पवित्र पर्वाच्या मोबदल्यात समस्त मानवजातीचे रक्षण करो. आमीन.

खरं तर अल्लाह आपल्यावर खूप नाराज आहे, कारण तो प्रसन्न होईल, असे कोणतेही कार्य आपण सध्या करीत नाही. ज्या गोष्टीपासून त्याने आपल्याला रोखले, आपण अशा गोष्टींच्या जास्त आहारी गेलो. याचं एक साधं उदाहरण म्हणजे तो म्हणतो, दारू पिऊ नका, मात्र आपण कोरोना काळात दारूच्या दुकानासमोर मोठ्या रांगा लावल्या. 

अशी हजारो उदाहरणे आहेत कि, त्याने काही गोष्टी कधीही न करण्याबद्दल आपल्याला सांगितलं, पण आपण त्या जास्त प्रमाणात करतोय.  एकीकडे आपण मोठ मोठे मंदिर आणि मशिदी बनवतोय, प्रार्थना, पूजा -अर्चा करतोय. सप्ताह आणि इज्तमा भरवतोय आणि दुसरीकडं सगळ्या प्रकारचे कुकर्म करतोय. त्यामुळे ईश्वर आपल्यावर प्रचंड नाराज आहे, म्हणून त्याने मंदिर आणि मशिदीची द्वारे आपल्यासाठी बंद केली. ज्याची आपण कधी स्वप्नात देखील कल्पना केली नव्हती. तेव्हा प्रत्येकाने आत्मपरीक्षण करून मनोभावे देवापुढे नतमस्तक होण्याची गरज आहे, अन्यथा त्याचा प्रकोप (अजाब) सर्व काही नष्ट करून टाकेल. कोरोना ही त्याची एक झलक होती.

या लेखमालेच्या माध्यमातून लाखो माणसे एकमेकांशी सद्विचाराने जोडली गेली. सोशल मीडियाचा अतिशय चांगला उपयोग या लेख मालिकेसाठी सर्वांनी केला. ही लेखमाला वाचकापर्यंत पोहोचवणारे आमचे सर्व सहकारी, सर्व वाचक आणि एकमेकांना लेख पाठवून या विचारांना प्रोत्साहन देणारे समस्त आपण सर्वजण या सर्वांना अंत:करणापासून धन्यवाद देतो. चांगल्या विचारांची माणसं आजही समाजामध्ये खूप आहेत, हे या महिन्यांमध्ये प्रकर्षाने जाणवले. जोपर्यंत ही माणसं, हे विचार जिवंत आहेत, तोपर्यंत हा देश असाच बंधुभावाच्या सूत्रांमध्ये एक राहील, याची खात्री वाटते. सर्वांना मनापासून धन्यवाद.

आज सायंकाळी चंद्र दर्शनानंतर पवित्र रमजान महिन्याची सांगता होणार आहे. एक महिना कसा निघून गेला ते कळले देखील नाही. जगाच्या विनाशाची जी कारणे कुरआनमध्ये दर्शविली आहेत. त्यामधील एक प्रमुख कारण आहे, दिवसांची बरकत निघून जाईल. हजरत पैगंबर साहेबांनी याबाबत असे नमूद केले आहे कि, ज्यावेळी जगाचा विनाश जवळ येईल, त्यावेळी वर्ष महिन्यासारखे, महिने आठवड्यासारखे, आठवडे दिवसासारखे, दिवस तासासारखे आणि तास मिनिटांसारखे निघून जातील. आज आपण अनुभवतोय कि दिवस भराभर निघून जात आहेत. नवीन वर्ष सुरू होऊन चार महिने झाले यावर विश्वास देखील बसत नाही. 

जीवनाचा एक एक दिवस कमी होत असताना आपण मात्र वाढदिवस साजरे करतो, यापेक्षा वेगळे दुर्देव नाही. रमजान महिना ही त्याला अपवाद नाही. तीव्र उन्हामध्ये हा महिना सुरू झाला. आता कसं होणार ? हा प्रश्न विचारला जात होता. परंतु ईश्वरी कृपेने ज्यांनी मनाचा ठाम निश्चय केला होता, त्यांचे सर्व रोजचे पूर्ण झाले. तरावीह देखील पूर्ण झाली. एकदा पक्का निश्चय केला कि परमेश्वर सुद्धा मदत करतो, याचा प्रत्यय यानिमित्ताने अनेकांनी घेतला. जुजबी कारण सांगून अनेकांनी टाळले देखील. परंतु हे विधिलिखित आहे. एखाद्याचं मन प्रार्थनेमध्ये करमत नसेल तर याचा अर्थ असा नाही कि, तो भक्त नाही. याचा अर्थ असा आहे कि, देवाला त्याच्या प्रार्थनेची आवश्यकता नाही. कधी कधी धार्मिक संस्कारामध्ये मन रमत नाही. इतर गोष्टींकडे मात्र जास्त प्रमाणात रमत असतं. परमेश्वर हा आपल्या प्रार्थनेसाठी आतुर नाही. आपण आपल्या मनाने त्याची करुणा भाकली पाहिजे. त्याचे हजारो फरिश्ते चोविस तास त्याचे नामस्मरण करीत आहेत. आपल्या प्रार्थनेची त्याला आवश्यकताच नाही, हे सर्व  आपण आपल्यासाठी करायचे आहे.

ज्यांनी पूर्ण महिन्याचे पालन केले, त्यांना हा खरा ईदचा आनंद मिळणार आहे. अशा सर्वांचे अभिनंदन... रमजान महिन्याची सांगता होताना अल्लाहची रहमत, बरकत आपल्या सर्वांवर व आपल्या देशावर सतत होत राहो, हीच अल्लाहकडे प्रार्थना. मनापासून आभार. शुक्रिया ... शुक्रिया ... अलविदा ... अलविदा ... !

सलीमखान पठाण

९२२६४०८०८२