श्रीरामपूर/प्रतिनिधी : मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याचे सलग पाचव्या वर्षी पूर्ण महिन्याचे रोजे उपवास करून येथील लताबाई पोपटराव वाघचौरे (औटी मॅडम) यांनी धार्मिक सलोख्याचे उत्तम उदाहरण घालून दिलं आहे. त्यांच्या या उपक्रमाचे समाजातील सर्व थरातून स्वागत होत असून त्यांचं अभिनंदन होत आहे.
सौ. लताबाई वाघचौरे या नगरपालिका शाळेच्या सेवानिवृत्त पदवीधर शिक्षिका आहेत. आज त्यांचे वय ६० वर्षे आहे. कोरोना काळात २०२० पासून दरवर्षी त्यांनी पवित्र रमजान महिन्याचे महिनाभराचे पूर्ण रोजे करण्यास सुरुवात केली. यावर्षी सलग पाचव्या वर्षी हे रोजे पूर्ण केले आहेत.
याबाबत बोलताना सौ. वाघचौरे यांनी सांगितले कि, रमजान महिन्यात रोजी धरण्याची परंपरा आमच्या कुटुंबात फार पूर्वीपासून आहे. माझी आजी सासू तसेच सासूबाई या सुद्धा रमजानचे रोजे करीत होत्या. सोनगाव येथील जी मशिद आहे, तेथे माझे सासरे व सासू यांनी नवस केला होता. त्यानंतर त्यांना पाच मुले झाली. त्यानंतर माझ्या सासूबाईंनी हे व्रत चालू ठेवले. त्यांना पाहून मी सुद्धा मला मुलगा झाला तर मी रोजे ठेवीन, असा नवस केला.
१९९२ साली मला पुत्रप्राप्ती झाली, त्यानंतर मी १९९४ पासून रोजा धरण्यास सुरुवात केली. सुरुवातीची २८ वर्षे मी दोन ते दहा पर्यंत रोजा दरवर्षी करीत होते, परंतु कोरोना काळात सन २०२० पासून मी पूर्ण महिन्याचे रोजे करण्यास सुरुवात केली. आता यावर्षी सलग पाचव्या वर्षी मी रमजान चे पूर्ण महिन्याभराचे रोजे पूर्ण केले आहेत.
रोजे पूर्ण केल्याने शरीर शुद्ध होते, तसेच वर्षभर प्रसन्न वाटते. मला अस्थम्याचा त्रास होता, परंतु रोजे धरण्यामुळे तो त्रास सुद्धा गेला. मला चैतन्य वाटते, शिवाय देवावर असलेल्या अढळ श्रद्धेमुळे आज वयाच्या साठाव्या वर्षी सुद्धा कडक उन्हाळ्यातही मला कसलाही त्रास झाला नाही. अल्लाह च्या कृपेने दरवर्षी माझी मनोकामना पूर्ण होते. यावर्षी माझ्या सुनबाई डॉक्टर झाल्या, माझ्या मुलाला व मुलीलाही मुलगा झाला. मी खूप आनंदी आहे, अल्लाहने सर्वांना आनंदी ठेवावे, हीच माझी प्रार्थना आहे.
माझ्या या संकल्पपूर्तीमध्ये माझे पती पोपटराव वाकचौरे मुलगा डॉ. गणेश, सून डॉ. रचना यांचे खूप सहकार्य लाभले. त्यांनी रोजा धरण्यासाठी मला प्रोत्साहन दिले. या कामे माझे बंधू सलीमखान पठाण यांचे सुद्धा मला मोलाचे मार्गदर्शन मिळाले, असेही त्यांनी सांगितले.
सौ. लताबाई वाघचौरे यांनी रमजानचे रोजे पूर्ण करून हिंदू-मुस्लिम तालुक्याचे उत्तम उदाहरण समाजासमोर घालून दिले आहे, त्याबद्दल त्यांचे समाजातील सर्व थरातून अभिनंदन होत आहे.