सोलापूर : येथील श्री स्वामी समर्थ बिडी उत्पादक सहकारी संस्था, ३१ मार्च रोजी संचालक मंडळांने कुठलीही पूर्वसूचना न देता अचानक बंद केलीय. त्यामुळे ४०० ते ५०० कामगार देशोधडीला लागले आहे. हा कारखाना तात्काळ चालू करा, महिला बिडी कामगारांचे संपूर्ण देय रक्कम मिळवून द्या आणि कायदेशीर कारखाना बंद करणाऱ्यावर कारवाई करा, अशा मागणीचे लेखी निवेदन महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने प्रदेशाध्यक्ष विष्णू कारमपुरी यांच्या नेतृत्वाखाली उपनिबंधक सहकारी संस्था सोलापूर यांच्याकडे देण्यात आले आहे.
सोलापूर शहरातील श्रीस्वामी समर्थ बिडी औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था हा विडी कारखाना ३१ मार्च २०२४ पासून महिला कामगारांना कुठलीही लेखी पूर्व सूचना न देता मनमानी पद्धतीने बेकायदेशीररित्या बंद करण्यात आलाय.
त्यामुळे या कारखान्यात काम करणाऱ्या सुमारे ४०० ते ५०० कामगार बेकार झाले आहेत. त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. यास संपूर्ण जबाबदार या संस्थेचे चेअरमन, सेक्रेटरी व संचालक मंडळ आणि मूळ मालक सुनील क्षत्रिय हे आहेत.
महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने सदर संस्थेचे बेकायदेशीर कामकाजाविरुद्ध ०६ ऑक्टोबर २०२३ व ०६ नोव्हेंबर २०२३ अशा दोन्ही वेळेला निवेदन देऊन संस्थेची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली, परंतु याबाबत आपल्या कार्यालयाकडून कुठलीही कार्यवाही झालेली नाही.
यासंदर्भात वेळीच कारवाई झाली असती तर कारखाना अचानक बंद करण्याचा निर्णय संस्था घेतली नसती, एकूणच कारखाना अचानक बंद केल्याने शेकडो कामगारांना होत असलेला त्रास कमी करण्यासाठी आपल्या माध्यमातून कारखाना चालू करण्याचे आदेश द्यावे, अशी विनंती या निवेदनात करण्यात आलीय.
जिल्हा उपनिबंधक यांना विष्णू कारमपुरी यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात रेखा आडकी, विठ्ठल कुऱ्हाडकर, अमित भोसले, रमेश चिलबेरी, पाटील आदींचा सहभाग होता.
फोटो ओळ : श्री स्वामी समर्थ बिडी उत्पादक सहसंस्था नावाने असलेले, बिडी कारखाना त्वरित चालू करून, कामगारांना नुकसान भरपाई द्या अशा मागणीचे निवेदन जिल्हा उपनिबंधकांना देताना विष्णू कारमपुरी व कामगार सेनेचे पदाधिकारी दिसत आहेत.