सोलापूर : एप्रिल महिन्यात ०९ तारखेला येणारा गुढी पाडवा, ११ तारखेला येणारी रमजान ईद आणि १४ एप्रिलला येणारी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यासाठी राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्च पेड इन एप्रिलचे वेतन वेळेवर व्हावे, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाच्यावतीने राज्याचे शिक्षण आयुक्त यांना सादर करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सोलापूर शहर व जिल्ह्यात १४ एप्रिलपासून ते ३० एप्रिलपर्यंत साजरी करण्यात येते. या कालावधीत सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक कार्यक्रम, उपक्रम साजरे केले जातात. वेगवेगळ्या स्पर्धा, स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात. बौद्ध बांधवाकडून ग्रंथ खरेदी केली जाते. घरावर, शहरातील रस्त्यावर, चौका-चौकात विद्युत रोषणाई केली जाते. या साठी पैशाची गरज असते. त्यामुळे मार्च पेड इन एप्रिलचे वेतन वेळेत करण्यात यावे, अशी मागणी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केली.
शिष्टमंडळामध्ये राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधीप्रकाश गायकवाड, उपाध्यक्ष रमेश लोखंडे, जिल्हाध्यक्ष प्रा. युवराज भोसले, जिल्हा सेक्रेटरी रविकुमार देवकर, सहसचिव प्रा. डॉ. राजदत्त रासोलगिकर, जिल्हा खजिनदार दाऊत आतार, सिद्धेश्वर भुरले, बसवेश्वर पाटील, पांडुरंग सुर्वे, संदीप राजगुरू, महानंदा शिंदे, निर्मला मौळे, आसिफ कंदलगावकर, महिबूब तांबोळी, इरफान शेख, नागेश सातपुते, प्रा. अभिजित भंडारे, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
या निवेदनाच्या प्रती जिल्हा अधिकारी सोलापूर, शिक्षण अधिकारी( प्राथमिक/माध्यमिक सोलापूर ),अधीक्षक वेतन पथक(प्राथमिक/माध्यमिक ) सोलापूर यांना देण्यात आल्या आहेत.