रमजान महिना आता आठवडाभरात पूर्णत्वास जाणार आहे. आता प्रत्येक जण उर्वरित दिवसांचा लाभ घेण्यासाठी अगतिक झाला आहे. मशिदींमधून रात्री तरावीहच्या नमाज मध्ये केले जाणाऱ्या कुरआन शरीफचे पठन येत्या काही दिवसात पूर्ण होईल. कुरआन मधील शिकवण ज्यांनी अंगीकारली ते जीवनात व आखेरत मध्ये यशस्वी होतील.
जगातील प्रमुख धर्मापैकी दुसऱ्या क्रमांकाचा धर्म म्हणजे इस्लाम. इस्लामने जगाला एका ईश्वराची आराधना करण्याचा संदेश दिला. इस्लामनुसार एका ईश्वराचीच पूजा (प्रार्थना) केली पाहिजे, जो आपल्या सर्वांचा मालिक आहे. त्याला कोणताही रंग, रुप नाही. त्याला कोणी बनवले नाही, पण त्याने प्रत्येक वस्तु बनविली.
इस्लामी शिकवणीचे प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत -
तुमच्या कष्टाच्या कमाईतून अडीच टक्के गरीबांना कोणत्याही परिस्थितीत देणे आवश्यक आहे. तुम्ही लोकांना मदत करा, खुदा तुम्हाला मदत करील. स्वतःसाठी जे पसंत करता, तेच इतरांसाठी करा तरच एक सच्चे मुसलमान बनू शकता.
वर्षातून एकदा महिनाभर सकाळपासून सायंकाळपर्यत उपाशी व तहानलेले (प्यासे) रहा, म्हणजे तुम्हाला जाणिव होईल कि भूख आणि प्यास काय असते. तुमच्या घरात मुलगी जन्मली तर नाराज होऊ नका. बेटी तर अल्लाहची रहमत (इनाम) आहे, जी व्यक्ति आपल्या कष्टाच्या कमाईतून आपल्या बेटीची परवरिश (पालनपोषन) करून चांगल्या घरी लग्न करुन देईल, तो जन्नत मध्ये जाईल.
जो स्त्रियांशी चांगले वर्तन (सुलूक) करतो, ती सर्वात चांगली व्यक्ति होय. विधवा शापित (मनहूस) नसतात. त्यांनाही चांगले जीवन जगण्याचा अधिकार आहे, म्हणून विधवा आणि त्यांच्या अपत्यांचा स्विकार करा.
नमाज पठन करतांना एकमेकांच्या बाजूला बाजू लावून उभे रहा, कारण तुम्ही सर्व समान आहात. तुमच्यात कुणीही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही. आपल्या शेजाऱ्यांशी चांगले वर्तन करा, भले ते ओळखीचे असोत अथवा नसोत. दारु आणि जुगार सर्व विनाशाचे मूळ आहे. स्वतःला यापासून दूर ठेवा. मजूराचा घाम सुकण्यापूर्वी त्याची मजूरी आदा करा आणि कधीही कुणी अनाथ किंवा गरिबाची बददुआ ( तळतळाट )घेऊ नका, अन्यथा बरबाद व्हाल.
प्रसन्न राहायचे असेल तर श्रीमंताकडे पाहू नका, गरीबांकडे पहा, तर खुश रहाल. लोकांशी सद् वर्तन करणे पुण्याचे कार्य आहे. नेहमी नैतिकता आणि सच्चाईच्या मार्गाने चला, नेहमी खरे बोला, दिलेले आश्वासन किंवा केलेले वायदे पूर्ण करा आणि कधीही कुणाचे मन दुखवू नका. आवश्यकता असल्यासच पाण्याचा उपयोग करा, विनाकारण पाण्याचा दुरुपयोग करणे पाप आहे.
अनोळखी महिलेवर नजर (दृष्टी) पडल्यास नजर खाली करा, कारण महिलांना वाईट नजरेने पाहणे पाप आहे. व्यभिचार करू नका. पतीने पत्नीला अगर पत्नीने पतीला धोका देऊ नये.
कुरआन फक्त मुस्लीमांचा धार्मिक ग्रंथ नाही. कुरआन तर केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील मानवांसाठी, प्रत्येक समाजासाठी सद् मार्गावर चालण्याचा आणि उत्कृष्ट जीवन जगण्याचा मार्ग आहे. ईश्वर किंवा अल्लाह हा फक्त मुस्लीमांचा रब नाही, तर तो सर्वसृष्टीचा (आलम) आहे, म्हणून त्याला रब्बुल आलमीन म्हटले आहे. तसेच हजरत पैगंबर हे फक्त मुस्लीमांचे पैगंबर नाही तर सर्वसृष्टीसाठी आहेत, म्हणून त्यांना रहमतुललील आलमीन म्हटले आहे. प्रत्येक धर्मातील संत, महात्मे व थोर विभूतींचा आदर व सन्मान करण्याची शिकवण हजरत पैगंबरांनी दिली आहे. (क्रमशः)
सलीमखान पठाण
9226408082