श्रीरामपूर : हजरत सय्यद बाबा उरूस व रामनवमी यात्रोत्सवाची या वर्षाची सुरुवात करणारा शुभारंभाचा कार्यक्रम बहारदार असा अखिल भारतीय कौमी एकता मुशायरा (कवि संमेलन) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी सर्व पक्षीय नेत्यांची उपस्थिती अन् नागरिकांच्या प्रचंड प्रतिसादात रविवारी रात्री उत्साहात पार पडला.
आंतरराष्ट्रीय किर्तीचे शायर अबरार काशीफ यांची मंत्रमुग्ध करणारी शायरी, सर्वपक्षीय प्रमुख पुढार्यांची उपस्थिती हेही या मुशायरा कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले. मागील चार वर्षात कोरोना काळ व रमजान महिन्यामुळे मुशायऱ्याचे कार्यक्रम झाले नव्हते. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये या कार्यक्रमाबद्दल प्रचंड उत्सुकता होती.
यावर्षी आलेले शायर अबरार काशीफ, झहीर अख्तर, कमर एजाज, इरशाद वसिम यांनी आपल्या संजीदा शायरीने प्रेक्षकांना खिळवून ठेवले तर हास्य कवी राहत हसरत, इब्राहिम सागर, रोबोट मालेगावी यांच्या हास्यरचनांनी प्रेक्षकांची वाहवा मिळवली. मालेगावचे तरुण शायर इरशाद अंजूम यांच्या बहारदार सूत्रसंचालनाने कार्यक्रमाची रंगत वाढवली. मराठी कवी मिर्झा एक्सप्रेस यांनी देखील आपल्या रचना सादर केल्या.
मुशायरा कार्यक्रमाचे उद्घाटन लोकनेते भानुदास मुरकुटे, आमदार लहुजी कानडे, माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक, माजी उपनगराध्यक्ष करण ससाने, हेमंत ओगले, डॉ. रवींद्र कुटे, रंजना पाटील, अशोक कानडे, सचिन गुजर, संजय छल्लारे, अशोक उपाध्ये, गौतम उपाध्ये, मुन्ना पठाण, सलीमखान पठाण, मोहम्मद रफीक शेख, साजिद मिर्झा, संजय जोशी, शांतीलाल पोरवाल, रवी गुलाटी, राजेश अलग, रियाज पठाण, मुनीर शेख, मुख्तार मनियार, शाहिद कुरेशी, अर्चना पानसरे, शिल्पा आव्हाड, पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक गाडेकर, अनिल पांडे, महेश माळवे, रवि भागवत, माऊली मुरकुटे आदींसह अनेक मान्यवरांचे उपस्थितीत संपन्न झाले. खासदार सदाशिव लोखंडे व माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी देखील या कार्यक्रमास हजेरी लावली.
मागील चार वर्षात कार्यक्रम न झाल्याने प्रेक्षक मुशायरा कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत होते. औरंगाबादचे कवी कमर एजाज यांनी आपल्या नेहमीच्या धीर गंभीर आवाजात जीवनाचे सत्य मांडणाऱ्या रचना सादर केल्या. शायर जहिर अख्तर यांनी देखील उपस्थितांची वाहवा मिळविली.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असलेले आंतरराष्ट्रीय कवी अबरार काशीफ यांनी,
मेरे रब की मुझपर इनायत हुई,
कहू भी तो कैसे इबादत हुई
ही जगप्रसिद्ध रचना सादर करून मुशायरा डोक्यावर घेतला. सर्वच कवींना प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. कार्यक्रमास हजारोच्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते.
बॅरिस्टर रामराव आदिक चौकात झालेला हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला. जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील विविध मान्यवर प्रेक्षकांची उपस्थिती ही उल्लेखनीय होती. सामाजिक क्षेत्रातील कार्यरत विविध पदांवर निवड झालेले संजय जोशी, गौतम उपाध्ये, रवींद्र गुलाटी, डॉ. रवींद्र कुटे, अशोक गाडेकर, अनिल पांडे, महेश माळवे, राजू इनामदार आदींचा मुशायरा कमिटीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुशायरा कमेटीचे संस्थापक व संयोजक सलीमखान पठाण, अध्यक्ष मोहम्मद रफिक शेख, स्वागताध्यक्ष मुन्ना पठाण, कार्याध्यक्ष संजय जोशी, संघटक मुनीर शेख,उपाध्यक्ष - डॉ. रविंद्र कुटे,रियाज पठाण,जावेद काझी, शांतीलाल पोरवाल, मुख्तार मनियार, गणेश मगर, एजाज शेख, मोहम्मद रफिक (बाबा), सचिव आसिफ शेख, सहसचिव सलीम जहागिरदार, खजिनदार साजीद मिर्झा, सह खजिनदार फिरोज पोपटीया, दिलावर पेंटर, सदस्य - सौ. रंजना पाटील, राजेश अलघ,प्रताप देवरे, नजीरभाई शेख, दीपक कदम, मोहम्मद रफीक बाबा, नंदू , मजहर शेख, फिरोज पोपटीया, नजीर शेख,शरीफ मेमन, आदिल सहमुशारा कमिटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार मुशायरा कमिटीचे संस्थापक व संयोजक सलीमखान पठाण यांनी मानले.
""""""""""
श्रीरामपूर चा मुशायरा अबरार काशीफ यांनी अक्षरशः लुटला
श्रीरामपूर : मुशायरा कमिटी मार्फत आयोजित केलेला १८ वा ऑल इंडिया कौमी एकता मुशायरा उर्दूचे सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त शायर अबरार काशीफ (अमरावती) यांनी अक्षरशः लुटला असं म्हणावं लागेल. जवळपास पाऊण तासाच्या आपल्या शायरीमध्ये त्यांनी उपस्थित हजारो प्रेक्षकांना खिळवून ठेवले. त्यांच्या काव्य वाचनादरम्यान टाळ्यांचा वारंवार कडकडाट होत होता. 'वाह वाह' चा घोष होत होता. उपस्थित हजारो प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करीत संजिदा उर्दू शायरी चा रोमांचक अनुभव उपस्थितांना आला. त्यांच्या शायरीची ही बोलकी छायाचित्रे....!