रमजानुल मुबारक -२५ संबंध विच्छेदनाची सोपी पद्धत म्हणजे तलाक

shivrajya patra

 

मजान महिन्याचे काहीच दिवस शिल्लक राहिल्याने  आता ईदच्या तयारीने वेग धरायला सुरुवात झाली आहे. नविन कपडे खरेदीची लगबग ही वाढली आहे. बच्चे कंपनीचा उत्साह ही जोरात आहे. ईदची तयारी करतांना समाजातील गरीब, विधवा,अनाथ,गरजू, आजारी रुग्ण यांचेकडे ही लक्ष दिले पाहिजे, म्हणजे त्यांनाही ईदच्या आनंदात सहभागी होता येईल, याबाबत प्रेषित पैगंबरांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाने आचरण करावे.

प्रत्येक धर्मात लग्नाच्या विधी, चालीरिती यामध्ये वेगळेपण दिसून येते. लग्नसंबंध विच्छेद करण्यासाठी घटस्फोट किंवा डायव्होर्स घेतला किंवा दिला जातो. यालाच मुस्लीम धर्मिय तलाक म्हणतात. देशात मोदी सरकार आल्यापासून तलाकचा मुद्दा खूपच चर्चेत आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयात अनेक प्रकणे न्यायप्रविष्ट आहेत. मुस्लीम समाजात तलाकच्या रुपाने स्त्रियांवर फार मोठे अत्याचार किंवा अन्याय केला जातो, असे चित्र देशातील प्रसारमाध्यमांनी उभे केलेले आहे, मात्र यातील पूर्ण सत्यता समजून घेण्याचा फारसा प्रयत्न न करता केवळ राजकारण करण्याचा हेतूच जास्त असल्याचे दिसून येते.

मुस्लीम महिलेला दिलेला घटस्फोट म्हणजे तलाक होय. पण केवळ तीनदा तलाक, तलाक, तलाक म्हटल्याने लगेच तलाक झाला, एवढे सोपे हे काम नाही तर शेवटच्या घटकेपर्यंत पती पत्नीमध्ये काडीमोड होऊ नये, यासाठी प्रयत्न करावयाचे असून शेवटी अगदी नाईलाजास्तव सर्व पर्याय संपल्यानंतर तलाक देऊन विभक्त होता येते. 

तलाक म्हणजे पती-पत्नीची नाते अगदी नाईलाज झाल्यानंतर संपुष्ट काढण्याची सोपी पद्धत आहे. हिंदू विवाह कायद्यांतर्गत घटस्फोट घेणे खूप किचकट आहे. त्यासाठी पती-पत्नीला आपल्या जोडीदाराबद्दल चे अनेक पुरावे द्यावे लागतात. यामध्ये महिला वर्गाच्या अब्रूचे धिंडोरे सुद्धा निघतात.

हजरत पैगंबरांनी तलाक देण्याच्या प्रथेला सर्वात वाईट म्हटले आहे. जेव्हा पती-पत्नीचे नाते निभावणे अगदीच अशक्यप्राय होऊन जाते, त्यावेळी विभक्त होण्यासाठी सरळ व सुटसुटीत मार्ग म्हणून तलाक दिला जातो. तलाक झाल्यानंतर स्त्री आणि पुरुष दोघेही पुनर्विवाह करण्यास मोकळे होतात. तलाकच्या माध्यमातून इस्लामने स्त्रीला पुनर्विवाहचा अधिकार बहाल केला आहे. अनेक धर्मात महिलांना पुनर्विवाहाचा अधिकार नाही. विधवा देखील पुनर्विवाह करू शकतात. ही शिकवण इस्लामने दिली. 

पुनर्विवाह करुन समाजात सन्मानाने जगण्याचा मार्ग महिलांना इस्लामने उपलब्ध करुन दिला आहे. महिलांना सर्वात जास्त अधिकार इस्लामने दिले आहेत. तलाक पिडीत मुस्लीम महिलांसाठी आक्रोश करणाऱ्या घटकांनी देशात तीन कोटींपेक्षा जास्त हिन्दू धर्मिय महिला भगिनी घटस्फोटित आहेत. त्यांना पुनर्विवाह चा अधिकार द्यावा, म्हणजे त्या सुध्दा सुलभ जीवन जगू शकतील. 

एखादी महिला जेव्हा घटस्फोटित होते, तेव्हा समाज तिच्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहतो, त्यातच जर ती एकटी असेल तर समाजातील अनेक लांडगे तिची लक्तरे तोडू पाहतात. अशा महिलांनी दुसरे लग्न करुन मानाने जगावे ही इस्लामी शिकवण आहे. घटस्फोटितांना काय काय सहन करावे लागते, हे कोणत्याही धर्माच्या महिला भगिनींना भेटा म्हणजे समजेल. 

तलाक पिडीत महिलांचे शक्य तितक्या लवकर लग्न लावा, ही शिकवण हजरत पैगंबरांनी दिली आहे. तलाक म्हणजे पोरखेळ नव्हे, ही बाब सर्वांनी ध्यानात घ्यावी.  कोरोना नंतर एकल महिलांची जे प्रश्न निर्माण झाले, त्यामध्ये विधवा आणि परितक्त्या महिलांचे प्रश्न देखील समोर आले. 

आमचे काही मित्र या चळवळीत काम करतात. अशा महिला भगिनींना आलेले खूपच विदारक अनुभव त्यांना ऐकायला मिळाले. अचानकपणे काळाचा घाला पडलेल्या अशा भगिनींना पुनर्विवाहाची संधी मिळाली पाहिजे, त्यासाठी एक मोठी चळवळ उभी राहणे आवश्यक आहे. 

केंद्र शासनाने तलाक विरोधी कायदा केला, मुस्लिम समाजाने देखील त्याचे स्वागतच केले आहे. परंतु यामध्ये एक महत्त्वाची त्रुटी अशी आहे कि, एखाद्या व्यक्तीने आपल्या पत्नीला बेकायदेशीर तलाक दिल्यानंतर त्याला तर जेलमध्ये टाकले जाणार आहे. मात्र त्या महिलेच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था काय ? याचे उत्तर या कायद्याने दिलेले नाही. (क्रमशः)

सलीमखान पठाण

  9226408082


To Top