तहसिल कार्यालयातून चोरला होता वाळूने भरलेला टेम्पो
सोलापूर : परिसरामध्ये अवैधरित्या वाळूचे उत्खनन करुन, ती वाळू छुप्या पध्दतीने विक्रीवर नियंत्रण आणण्यासाठी महसुल खात्याने नेमलेल्या भरारी पथकाने ३० मार्च रोजी रात्री अवैधरित्या वाळू वाहतुक करणारा टेम्पो (MH-12-R 8676) पकडला होता. पुढील कारवाईकरिता उत्तर तहसील कार्यालयाच्या आवारात लावलेला हा टेंपो चोरुन नेल्याच्या गुन्ह्यात शहर गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या. सचिन दयानंद शिंदे (वय-२८ वर्षे) असं या धाडसी चोरट्याचं नांव आहे.
उत्तर तहसील कार्यालयाच्या आवारात लावलेला टेम्पो अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार ३१ मार्च रोजी सकाळी निदर्शनास आला. याप्रकरणी मंडल अधिकारी यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून वाळू ने भरलेला टेम्पो चोरीचा गुन्हा सदर बझारर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला.
गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी, टेम्पो चोरीस गेलेल्या परिसरातील सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्यांची पडताळणी केली. या पथकाला मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे, पोउपनि अल्फाज शेख व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी, आरोपी सचिन दयानंद शिंदे (रा.मु.पो. टाकळी, ता.दक्षिण सोलापूर) यास वाळूने भरलेल्या टेम्पोसह ताब्यात घेतले.
या आरोपीकडे गुन्ह्याचे अनुषंगाने अधिक तपास केला असता, अनिल व्हनमाने (रा. मु. समशापूर, पो. नंदुर, ता. दक्षिण सोलापूर) याचे सांगण्यावरुन ३१ मार्च रोजी पहाटे ०३.०० वा. च्या सुमारास उत्तर तहसील कार्यालय, सोलापूर येथून चोरी केला असल्याची कबुली दिली.
आरोपी सचिन दयानंद शिंदे याचा सदर बझार पोलीस ठाण्याकडील भादंवि कलम ३७९ या गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने, त्यास ताब्यात घेऊन, त्याच्याकडून गुन्ह्यात चोरी केलेला वाळूने भरलेला टेम्पो जप्त करुन ०१,१२,००० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा उघडकीस आणला.
ही कामगिरी, पोलीस आयुक्त एम. राजकुमार, डॉ. दीपाली काळे, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे), श्रीमती प्रांजली सोनवणे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे), सुनिल दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे शाखा), यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि. अल्फाज शेख, पोलीस अंमलदार दिलीप किर्दक, बापू साठे, भारत पाटील, सुभाष मुंढे, सैपन सय्यद, वसिम शेख, सतिश काटे, सायबर पोलीस ठाणेकडील अविनाश पाटील, प्रकाश गायकवाड, मच्छिद्र राठोड यांनी केली.