Type Here to Get Search Results !

पश्चिम विभागीय खेलो इंडिया खो-खो स्पर्धा ! दोन्ही गटात महाराष्ट्र अजिंक्य; मैथिली पवार व अश्विनी शिंदे स्पर्धेत सर्वोत्कृष्ट


मुंबई (क्रि. प्र.) : पश्चिम विभागिय खेलो इंडिया महिला खो-खो स्पर्धेत मुली आणि किशोरी दोन्ही गटात महाराष्ट्र संघानी कोल्हापूरवर सहज मात करत दुहेरी विजेतेपद पटकावले. मैथिली पवार आणि अश्विनी शिंदे या दोघींची सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड करण्यात आली.

मुंबईतील लालबाग येथील ओम साईश्वर सेवा मंडळ पेरू कंपाऊंड, मनोरंजह मैदानावर मुली आणि किशोरी गटातील अंतिम सामने रंगले. त्यामध्ये मुली गटातील अंतिम सामन्यात महाराष्ट्राने कोल्हापूरचा १६ गुणांनी (३४-१८) असा पराभव केला. महाराष्ट्र संघातर्फे सुहानी धोत्रे (२.१० मि. संरक्षण व ९ गुण), अश्विनी शिंदे (२.३० मि. संरक्षण व ६ गुण), प्रणाली काळे (२.२० मि. संरक्षण व २ गुण), स्नेहा लामकाणे (३ मि. संरक्षण) यांनी चांगला खेळ करत विजयात मोलाची कामगिरी केली. 

कोल्हापूर संघातर्फे वैष्णवी पवार (१.५० मि. संरक्षण व २ गुण) हिने चांगला खेळ केला. तसेच तिसरा क्रमांक छत्तीसगडला तर चौथा क्रमांक गुजरात संघाने पटकावला. वैयक्तिक पारितोषिकांमध्ये उत्कृष्ट संरक्षक वैष्णवी चाफे (महाराष्ट्र), उत्कृष्ट आक्रमक चैत्राली वाडेकर (कोल्हापूर), सर्वोत्कृष्ट खेळाडू मैथिली पवार (महाराष्ट्र) यांची निवड झाली.

किशोर गटातील अंतिम सामन्यात महाराष्ट्राने कोल्हापूरवर ०६ गुणांनी (२०-१४) मात केली. विजयी महाराष्ट्रातर्फे मैथिली पवार (३.३०मि. संरक्षण व ८ गुण), धनश्री लव्हाळे (३ मि. संरक्षण व ६ गुण), वैष्णवी चाफे (२ मि., १.३० मि. संरक्षण) यांनी चांगला खेळ केला. पराभूत कोल्हापूर संघातर्फे सई सावंत (१ मि. संरक्षण), चित्रावली वाडेकर (नाबाद १.१० मि., १.२० मि. संरक्षण व २ गुण) यांनी चांगला खेळ केला. या गटामध्ये मध्ये तिसरा क्रमांक गुजरात संघाने तर चौथा क्रमांक विदर्भने पटकावला. वैयक्तिक पारितोषिकांमध्ये उत्कृष्ट संरक्षक वैष्णवी पवार (महाराष्ट्र), उत्कृष्ट आक्रमक सुहानी धोत्रेकर (कोल्हापूर), सर्वोत्कृष्ट खेळाडू अश्विनी शिंदे (महाराष्ट्र) यांची निवड झाली.

-------

वाडीकुरोली येथील वसंतराव काळे प्रशालेच्या तिघींचा समावेश

सुवर्णपदक विजेत्या महाराष्ट्र संघात पंढरपूर तालुक्यातील वाडीकुरोली येथील वसंतराव काळे प्रशालेतील कल्याणराव काळे क्रीडा मंडळाची अष्टपैलू खेळाडू कल्याणी लामकाने (किशोरी गट), स्नेहा लामकाने व साक्षी देठे (कुमारी गट) यांचा समावेश होता. तसेच किशोरी संघाच्या प्रशिक्षकपदी प्रशालेतील सहशिक्षक अतुल जाधव यांची निवड झाली होती. त्यांच्या मार्गदर्शनामुळे संघास सुवर्ण प्राप्त झाले. 

सर्व यशस्वी खेळाडू व प्रशिक्षकांचे श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कल्याणराव काळे, सचिव बाळासाहेब काळे, भारतीय खो-खो महासंघाचे सहसचिव डॉ. चंद्रजीत जाधव, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सचिव ॲड. गोविंद शर्मा, सोलापूर खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष महेश गादेकर, प्रशालेचे प्राचार्य दादासो खरात, पर्यवेक्षक सत्यवान काळे आदींनी अभिनंदन केले.