सोलापूर : मोटार सायकल चोरी, महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून जबरी चोरी करणे यासारखे गुन्हे दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी सुनिल लक्ष्मीकांत अकोले (वय-३३ वर्षे) याला सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार करण्यात आल्याचे पोलिस आयुक्तालयाने शुक्रवारी, २२ मार्च रोजी सांगितले.
सन २०१५ ते २०२३ या कालावधीमध्ये, मोटार सायकल चोरी करणे, महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून जबरी चोरी करणे यासारखे अनेक गुन्हे सुनील लक्ष्मीकांत अकोले याच्याविरुद्ध दाखल आहेत. त्याच्याविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता.
सदर प्रस्तावाचे अनुषंगाने पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे यांनी कार्यवाही करुन त्यांचेकडील तडीपार आदेश क्र. ७६४/२०२४ / २० मार्च अन्वये, सुनिल अकोले (रा. ४३, न्यु सुनिल नगर, एमआयडीसी, सोलापूर) यास सोलापूर जिल्हा व धाराशीव जिल्हा येथून दोन वर्षाकरीता, २२ मार्च २०२४ पासून तडीपार केले आहे. त्यास तडीपार केल्यानंतर स्वारगेट, पुणे येथे सोडण्यात आलेले आहे.