Type Here to Get Search Results !

... रमजानुल मुबारक - १...

... रमजानुल मुबारक -१

रमजान- सदाचाराची शिकवण देणारा महिना

जगभरातील इस्लाम धर्मिय मुस्लिम बांधवांच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण व पवित्र समजला जाणाऱ्या रमजान महिन्यास आजपासून प्रारंभ झाला आहे. जगभरात या महिन्याचे श्रध्दापूर्वक पालन केले जाते.

रम्ज या शब्दाचा अर्थ जाळणे असा आहे. माणसातीत सर्व प्रकारच्या अवगुणांचा नाश करणे, आपल्यात असणाऱ्या वाईट सवयी नष्ट करणे या अर्थाने रम्ज चा रमजान असा शब्द रुढ झाला. या महिन्यातील प्रत्येक कार्य हे सदाचारास प्रोत्साहन देणारे असते.

रमजान हा इस्लामी वर्षाचा नववा महिना आहे. याला अल्लाहचा महिना म्हणून ही संबोधले जाते. याच महिन्यात पवित्र कुरआन शरीफचे पृथ्वीतलावर अवतरण झाले असल्यामुळे या महिन्यास विशेष महत्व प्राप्त झाले आहे. या महिन्यातील प्रार्थना, रोजे; न माज ', तिलावते कुरआन या माध्यमातून अल्लाह ची मर्जी संपादन करण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करीत असतो.

या महिन्याची मुख्य प्रार्थना म्हणजे रोजा अर्थात उपवास. पहाटेपासून सायंकाळी सूर्यास्तापर्यंत काहीही न खाता पिता उपाशी राहून रोजा पूर्ण केला जातो, मात्र पहाटे उठून रोजा धरण्यापूर्वी काही तरी जेवण करणे आवश्यक आहे. पहाटे च्या या जेवणाला सहेरी म्हणतात. सहेरी खाणे आवश्यक आहे. प्रेषित हजरत पैगंबर साहेब यांनी याबाबत शिकवण दिली आहे. त्यांनी आपल्या जीवनात केलेले कार्य सुन्नत म्हणून संबोधले जाते. सहेरी मध्ये आपणास शक्य आहे, तेवढे जेवण करावे. कधी-कधी उठण्यास उशीर झाला तर खाणे शक्य होत नाही, अशा वेळी ग्लासभर दूध किंवा पाणी पिऊन रोजा धरला जातो. काही ही न खाता पिता रोजा धरला जाऊ शकत नाही. (क्रमशः)

"" रमजानुल मुबारक - २ 

तरावीहची नमाज एक अपूर्व संधी

रमजान महिन्यात सर्वत्र भक्तांची मांदियाळी दिसून येते. मशिदी भरुन गेलेल्या असतात. अनेकांना नमाज अदा करण्यासाठी जागा ही मिळत नाही. रात्रीची तराविहची नमाज या महिन्यात विशेष करून अदा केली जाते. यामध्ये दररोज वीस रकअतमध्ये कुरआन शरीफचे पठन केले जाते. संपूर्ण कुरआन शरीफ मुखोदगत असलेले हाफिज या नमाजची ईमामत करतात. तरावीहच्या या नमाजमध्ये महिनाभरात संपूर्ण कुरआन शरीफचे वाचन व पठन पूर्ण केले जाते. वर्षातून किमान एकदा कुरआन शरीफचे पठन करणे आवश्यक मानले जाते. परंतु मानवाने स्वतःला दैनंदिन कार्य व व्यवहारात स्वतःला एवढे गुरफटून टाकले आहे कि देवाधर्मासाठी त्याच्याकडेे वेळच नाही. अशा लोकांसाठी तरावीह ही एक पर्वणी आहे. तिचा प्रत्येकाने लाभ घेण्याचा प्रयल करावा व आपल्याकडून झालेल्या चुकांचे परिमार्जन करुन घ्यावे.

दैनंदिन जीवनातीत भौतिक सुविधा प्राप्त करण्याच्या नादात माणूस अध्यात्मापासून दूर गेला आहे, म्हणूनच त्याला जिथं संधी मिळेल तिथं धार्मिक कार्यकमांना हजेरी लावून परमार्थ साधण्याचा तो प्रयल करीत असतो. रमजान महिन्यातील होणारी गर्दी ही याचाच एक भाग आहे.

कुरआन पठन ऐकण्याची संधी तरावीह नमाजच्या माध्यमातून मिळत असल्याने या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करावा, हे आपल्याच हिताचे आहे. मूळ कुरआन हे अरबी भाषेत आहे, ते समजून घेण्यासाठी जगातील प्रत्येक भाषेत त्याची भाषांतरं उपलब्ध आहेत. आपापल्या मातृभाषेतून ते समजून घेण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. (क्रमशः) 

माध्यम सेवा : सलीमखान पठाण,

           9226408082