Type Here to Get Search Results !

स्वराज्य संकल्पक शहाजीराजे !

 

                                              (१८ मार्च - जयंती दिवस)

शेकडो वर्षे गुलामीत जगणाऱ्यांच्या मनात स्वातंत्र्याचं स्फुल्लिंग चेतविणारे आणि ते अथक परिश्रमाने पुर्णत्वास आणणारे जगातील सर्वश्रेष्ठ पिता म्हणून ज्यांचा सन्मानाने उल्लेख करावा, असे पराक्रमी पण इतिहासकारांनी दुर्लक्षित केलेले महापुरुष म्हणजे शहाजीराजे.

निजामशाहीतील पराक्रमी सरदार मालोजीराजे यांचे ज्येष्ठ पुत्र, पराक्रमाचं बाळकडू पिता मालोजीराजे आणि चुलते विठोजी राजे यांच्याकडून मिळाले. सिंदखेडराजा येथील सरदार लखुजी राजे जाधव यांच्या कन्या जिजाऊं सोबत विवाहबद्ध झाले. इंदापूरच्या लढाईत पितृछत्र हरपले. चुलते विठोजी राजे आणि कनिष्ठ बंधू शरिफजी राजे, चुलत आठ बंधू सह निजामशाहीत पराक्रम गाजवू लागले. ऐन तारुण्यात भातवडीच्या लढाईत दैदिप्यमान कामगिरी बजावली आणि भोसले घराण्यास साजेसा पराक्रम गाजवला. यामुळे निजामशाहीत दबदबा निर्माण झाला. 

देवगिरीवर एका गैरसमजातून जाधव आणि भोसले घराण्यात खंडागळे हत्ती प्रकरणावरून रक्त सांडले गेले. वितूष्ठ निर्माण झाले. लखोजीराजे निजामशाही सोडून मुघलांकडे गेले.  शहाजीराजे आणि जिजाऊंच्या मनात स्वतंत्र राज्याची संकल्पना तेवत होती. लखोजीराजे पुढे निजामशाहीत दाखल झाले. निजामशाहाने धोकादायकरित्या लखोजीराजे आणि त्यांच्या मुलांची हत्या केली . या दगा-फटक्यामुळे शहाजीराजे आदिलशाहीत दाखल झाले. त्यांच्या पराक्रमाची जाण असल्याने त्यांना सन्मानाचे स्थान दिले गेले.

भोसले आणि जाधवांच्या गैरहजेरीत निजामशाही खिळखिळी झाली. सरदारांच्या अंतर्गत विवादाचा फायदा घेऊन निजामशाहीचा घास घेण्यासाठी मुघल सम्राट शहाजहान बादशहाने सैन्य पाठवले. शहाजीराजेंनी ही शाही वाचवण्यासाठी पराकाष्ठा केली. निजामशाहीच्या वंशातील बालकास बादशहा बनवून पुर्ण जबाबदारी स्विकारत पेमगिरी किल्ल्यात स्वतंत्र राज्यकारभार पाहू लागले. जवळपास दोन वर्षे हा लढा दिला. पण बळ कमी पडू लागले, म्हणून माघार घेतली, अन् आदिलशाहीत दाखल झाले. 

बेंगळुरू येथे स्थायिक झाल्यानंतर तेथील स्थानिक बंडखोरी मोडीत काढून आदिलशाहीचं संरक्षण करत करत स्वतंत्र राजा प्रमाणे राहू लागले. जेष्ठ पुत्र संभाजी आणि द्वितीय पुत्र शिवराय यांच्या शिक्षणाकडे लक्ष देऊन त्यांना स्वतंत्र राज्याचे निर्माते बनवण्यासाठी धडपड सुरू केली.  जिजाऊ आणि शिवबास पुणे जहागिरीकडे रवाना करतेवेळी स्वतंत्र राजमुद्रा, ध्वज, पराक्रमी सरदार, सैन्य, शस्त्र आणि खजिना दिले. कालांतराने हेच "हिंदवी स्वराज्य" जगत् वंदनीय ठरले. 

ज्येष्ठ पुत्र संभाजी राजे यांना बेंगळूर, शिवरायांना पुणे आणि तंजावर येथे एकोजीराजे (व्यंकोजी राजे) संपूर्ण दक्षिण भारतात स्वतंत्र राज्य स्थापन केले. एका सरदार पुत्राने संकल्पना करून तिन्ही पुत्रांना स्वतंत्र राज्य निर्माण करण्यासाठीची प्रेरणा दिली. यापुढे जाऊन राज्य उभारणीत आवश्यक संसाधने उपलब्ध करून दिली. एत्तदेशीय सत्ता स्थापन करणारे महाबली संस्कृत पंडित शहाजीराजे यांचा पराक्रम जाणिवपूर्वक लपविला गेला. जगातील अशा सर्वश्रेष्ठ पित्याचा आज, (१८ मार्च) जन्मदिन...  त्या निमित्ताने विनम्र अभिवादन... !

 🚩

🙏🏻

- राम गायकवाड, मराठा सेवा संघ, सोलापूर.