Type Here to Get Search Results !

गुन्हे शाखेच्या कामगिरीत मोटार सायकल व घरफोडी चोरीचे ०५ गुन्हे उघड


सोलापूर : शहरातील मोटार सायकल चोरी व घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासंबंधी असलेल्या वरिष्ठांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखेकडील सपोनि संजय क्षिरसागर व त्यांच्या तपास पथकाला मोटार सायकल व घरफोडीचे ०५ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आल्याचे माहिती कक्षाने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटलंय. 

सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय शिरसागर व त्यांच्या तपास पथकाने शहरातील दाखल मोटार सायकल चोरी व घरफोडीचे गुन्ह्याचा बारकाईने अभ्यास केला. या संसंधी बातमीदारांकडून माहीती घेत असताना गुरुवारी, ०७ मार्च रोजी सपोनि क्षिरसागर यांना ०२ जण चोरीची मोटार सायकल विक्री करण्यासाठी उस्मानाबाद-सोलापूर हायवेकडून, कचरा डेपोकडे जाणाऱ्या रस्त्यावर येणार असल्याची विश्वसनीय खबर मिळाली. 

त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि क्षिरसागर यांनी त्यांच्या तपास पथकासह तात्काळ जाऊन त्या ठिकाणी सापळा लावला.  बंडु मधुकर पवार (वय-२२ वर्ष, रा. ढोकबाभळगांव, ता. मोहोळ, सध्या रा. सांजा रोड, काका नगर, मंगल कार्यालया जवळ, धाराशिव) आणि दिनेश पंप्या शिंदे (वय-२२ वर्ष, रा-मानमोडी ता. तुळजापूर, जि.धाराशिव सध्या रा. सांजा रोड, काका नगर, सुनिता गायकवाड यांचे घरात भाड्याने, धाराशिव) हे त्या सापळ्यात अलगद सापडले.

त्यावेळी उभयतांच्या ताब्यात असलेल्या मोटार सायकलसंबंधी अधिक चौकशी करता, ती मोटार सायकल ही, जोडभावी पेठ पोलीस स्टेशनकडील भादवि ३७९ प्रमाणे दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटार सायकल असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर गुन्ह्याच्या तपासकामी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. 

त्यानंतर आरोपी नामे दिनेश पंप्या शिंदे याचेकडे कौशल्यपुर्वक तपास केला असता, त्याच्याकडून एम आय डी सी पोलीस ठाणे, नळदुर्ग, बेंबळी आणि जेलरोड पोलीस ठाण्याकडील घरफोडीचा गुन्हा असे आणखी ०४ गुन्हे उघडकीस आले. त्याच्या ताब्यातून हस्तगत करण्यात आलेल्या दुचाकींचे क्रमांक MH13/DC 2921, MH13/CV 9594, MH14/ GX 8912  आणि MH25/ AN3554 असे आहेत. अशा प्रकारे गुन्हे शाखेकडील सपोनि संजय क्षिरसागर व त्यांच्या तपास पथकानं उत्कृष्ट कामगीरी करून ०४ मोटार सायकल चोरी व ०१ घरफोडी चोरी असे ०५ गुन्हे उघडकीस आणून २,३५,००० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.

ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशा) डॉ. दीपाली काळे, सहा. पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, व.पो. नि. (गुन्हे शाखा) सुनिल दोरगे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि संजय क्षिरसागर, दिलीप किर्दक, अनिल जाधव, महेश शिंदे, राजु मुदगल, कुमार शेळके, सिध्दाराम देशमुख, अजय गुंड, प्रकाश गायकवाड, महिला पोलीस अंमलदार सुमित्रा बारबोले, निलोफर तांबोळी, ज्योती लंगोटे, शिलावती काळे व चालक बाळू काळे यांनी पार पाडली.