Type Here to Get Search Results !

... मोठी कामगिरी ! गंगेवाडीजवळ बोलेरोतून १, २०० लिटर हातभट्टी दारू जप्त


विशेष मोहिमेत ११ गुन्ह्यात ०९.५० लाखाचा मुद्देमाल हस्तगत

सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने शुक्रवारी व शनिवारी राबविलेल्या विशेष मोहिमेत सोलापूर- तुळजापूर रोडवर एका बोलेरो वाहनातून वाहतूक होणारी १२०o लिटर हातभट्टी दारूसह जिल्हाभरात हातभट्टी दारू तसेच विदेशी दारू वाहतूक करणाऱ्या चार मोटरसायकली जप्त केल्या. या विशेष मोहिमेत ११ गुन्ह्यात ०९.५० लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

या संबंधीचं सविस्तर वृत्त असं की, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाभरात छापा सत्र सुरू करण्यात आले असून राबविलेल्या विशेष मोहिमेत निरीक्षक नंदकुमार जाधव यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास सोलापूर-तुळजापूर रोडवरील दक्षिण सोलापूर तालुक्यातील गंगेवाडी परिसरात बोलेरो जीप क्रमांक MH 12 GK 4427 या वाहनातून १० रबरी ट्यूबमध्ये अंदाजे १, २०० लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करतांना आढळून आलेल्या समर्थ मोहन पवार (वय-२४ वर्षे) व कोंडीबा शिवाजी राठोड (वय-४७ वर्षे) या दोघांना अटक केलीय. या कारवाईत बोलेरो वाहनाच्या किंमतीसह ०६. ६१ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

दुय्यम निरीक्षक अंजली सरवदे यांच्या पथकाने सोलापूर शहरातील पोटफाडी चौक येथे अजय तुकाराम राठोड, (वय-२४ वर्षे, रा. मुळेगाव तांडा) हा इसम त्याच्या दुचाकी वाहन क्रमांक MH 13 DH 4313 वरून दोन रबरी ट्यूब मध्ये १६० लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना आढळून आला. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत ६८, २०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

एका अन्य कारवाईत निरीक्षक जगन्नाथ पाटील यांच्या पथकाने मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार सापळा रचून सुझुकी एक्सेस दुचाकी क्रमांक  MH 13 DN 9368 वरून १६० लिटर हातभट्टी दारू वाहतूक करताना गुन्हा दाखल केला,  या कारवाईत आरोपी इसम वाहन जागीच सोडून फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे. 

सांगोला दुय्यम निरीक्षक सौरभ भोसले यांनी मंगळवेढा शहराच्या हद्दीतील मंगळवेढा-मरवडे रोडवरील पेट्रोल पंपासमोर सायबण्णा सिद्धाराम पाटील (वय-२६ वर्षे) हा त्याच्या हिरो होंडा स्प्लेंडर क्रमांक MH 10 CS 8388 वरून विदेशी दारूची वाहतूक करताना आढळून आल्याने त्याचेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्या ताब्यातून १८० मिली क्षमतेच्या मॅकडॉल नंबर वन च्या १५ बाटल्या व रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या २४ बाटल्या असा ६६, ५७० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

पंढरपूर विभागाचे पथकाने माढा तालुक्यातील घोटी परिसरात टेंभुर्णी-पंढरपूर रोडच्या बाजूस एका मोकळ्या जागेत घनश्याम अर्जुन अंकुशराव (वय-४० वर्षे) या इसमास रॉयल स्टॅग व्हिस्की १८० मिली क्षमतेच्या १२ बाटल्या व मॅकडॉल रमच्या १० बाटल्यांसह अटक केली, त्याच्या ताब्यातून ३,६१० रुपये किंमतीची विदेशी दारू जप्त करण्यात आली. 


एका अन्य कारवाईत दुय्यम निरीक्षक करमाळा दत्तात्रय पाटील यांनी करमाळा तालुक्यातील जेऊर येथे राहुल नामदेव नवगिरे (वय-३२ वर्षे) या इसमास त्याच्या होंडा शाईन कंपनीच्या दुचाकी वाहन क्रमांक MH45 Z 8136 वरून एका कापडी पिशवीमध्ये डॉक्टर श्रीपूर ब्रांडी व्हिस्की च्या १८० मिलीच्या ४८ सीलबंद बाटल्यांची वाहतूक करताना पकडले, त्याच्या ताब्यातून वाहनासह एकूण ५३ हजार ४४४ किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एका अन्य कारवाईत दुय्यम निरीक्षक अकलूज यांच्या पथकाने माळशिरस तालुक्यातील फोंडशिरस येथे माणिक भिकू रणदिवे (वय - ४४ वर्षे) या इसमास २५ लिटर ताडीसह अटक केली. 

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथकाने सोलापूर शहरातील जुना पुना नाका येथे धाड टाकून तौफिक रफिक शेख (वय-३३ वर्षे) याच्या ताब्यातून ५० लिटर हातभट्टी दारू व गणेश बलभीम अनपट (वय-३४ वर्षे) याच्या ताब्यातून ५४ लिटर फ्रुट बिअर असा मुद्देमाल जप्त केला. सीमा तपासणी नाक्याच्या पथकाने कुंभारी परिसरात ज्योत्स्ना विजय मंजुलकर या महिलेच्या ताब्यातून २० लिटर व अंबादास रामस्वामी बिज्जा याच्या ताब्यातून २२ लिटर हातभट्टी दारू जप्त केली.

या मोहिमेत राज्य उत्पादन शुल्क विभागाने ११ गुन्ह्यात १, ६०० लिटर हातभट्टी दारू, २० लिटर विदेशी दारू, ५४ लिटर फ्रुट बियर व २५ लिटर ताडीसह ०१ बोलेरो व ०४ मोटरसायकली असा एकूण ०९.५० लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधीक्षक संजय पाटील, निरीक्षक सुनील कदम, जगन्नाथ पाटील, नंदकुमार जाधव, पंकज कुंभार, सचिन भवड, दुय्यम निरीक्षक अंजली सरवदे, धनाजी पोवार, बाळू नेवसे, सौरभ भोसले, दत्तात्रय पाटील, सुरेश झगडे, शिवकुमार कांबळे, मानसी वाघ, सहायक दुय्यम निरीक्षक अलीम शेख, गजानन होळकर, आवेज शेख, जीवन मुंढे, मुकेश चव्हाण, जवान चेतन व्हनगुंटी, शोएब बेगमपुरे,  इस्माईल गोडीकट, अशोक माळी, अण्णा कर्चे, नंदकुमार वेळापुरे, विकास वडमिले, तानाजी जाधव, गजानन जाधव, तानाजी काळे, योगीराज तोग्गी, वाहन चालक रशीद शेख, दीपक वाघमारे, रामचंद्र मदने व मारुती जडगे यांच्या पथकाने पार पाडली.