चपळगांव : रस्त्याच्या दुतर्फा गावातील महिलांची शिस्तबद्ध रांग... प्रत्येकाच्या हातात रंगीबेरंगी फुले... पारंपारिक वाद्यांचा कडकडाट... फटाक्यांची आतषबाजी अन् मिरवणुकीत सहभागी प्रत्येक ग्रामस्थांच्या चेहऱ्यावरचा आनंद..! या प्रसन्न वातावरणात प्रशासनातील एखाद्या अधिकाऱ्याचा नागरी सन्मान होणे म्हणजे नशिबच म्हणावे लागेल, अन् हे भाग्य लाभले सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांना...! बग्गीतुन मिरवणूक व जेसीबीतून फुलांची मुक्तपणे उधळण करत चपळगांव ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी आव्हाळे यांचा जागतिक महिला दिनानिमित्त जणू आपल्या ' लेकी ' चा करावा, असा नागरी सन्मान केला. गावातील माय-माऊल्या अन् बाप-माणसांची 'मनिषा' या नागरी सन्मानाने पूर्ण झाली.
जागतिक महिला दिन आणि महाशिवरात्रीच्या निमित्ताने सोलापूर जिल्ह्यातील विविध भागात वेगवेगळे कार्यक्रम सुरू असताना अक्कलकोट तालुक्यातील चपळगांव येथील ग्रामस्थांनी अनोख्या पद्धतीने महिला दिन साजरा करीत संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच वर्षा भंडारकवठे होत्या.
व्यासपीठावर सेवानिवृत्त अंगणवाडी पर्यवेक्षिका सुनंदा राजेगावकर, प्रा. डॉ. शिला स्वामी,रिणाती संस्थेच्या सचिवा रोहिणी पाटील, ग्रा. पं. सदस्या रेश्मा तांबोळी, वंदना कांबळे, वर्षा सोनार, चित्रकला कांबळे, गंगाबाई वाले, डॉ. लता रणखांबे, शोभा गजधाने, कोंडाबाई कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.प्रारंभी कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रार्थना घेण्यात आली.
यावेळी महिला सक्षमीकरण मेळाव्यात मनोगत व्यक्त करताना सुनंदा राजेगावकर,रोहिणी पाटील व शिला स्वामी यांनी प्रत्येक घरातील महिलांनी सबला बनण्याचे आवाहन केले.यावेळी कार्यक्रमासाठी विस्तार अधिकारी पंचायतचे युसुफ पठाण,तालुका वैद्यकीय अधिकारी आश्विन करजखेडे,आरोग्य विस्तार अधिकारी महेश भोरे, ग्रामसेवक सोमलिंग कणगी, परमेश्वर बिराजदार, श्रीधर नडीमेटला, डॉ.मनिष उमरिणीकर, पोलिस पाटील विवेकानंद हिरेमठ, आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक-सेविका, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका-मदतनीस, जिल्हा परिषद शाळेचे कर्मचारी, बचत गटाचे सदस्य व चपळगांव, बावकरवाडीतील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंभुलिंग अकतनाळ यांनी केले. शेवटी डॉ. विजयालक्ष्मी भंडारकवठे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
लेक समजून झालेला सन्मान लाख-मोलाचा
महिला दिनानिमित्त एखाद्या खेडेगावात नागरी सन्मान होणे मोलाचे आहे, परंतु चपळगाव वासियांनी आपल्याच गावातील लेक मोठ्या हुद्द्यावर गेली आहे व तिचा नागरी सन्मान करणे, हे प्रत्येकाचं कर्तव्य समजून गावातून मिरवणूक काढून माझा सन्मान केला, हे मी माझे भाग्य समजते. या सन्मानाने मी भावनिक झाले.
मनिषा आव्हाळे,
(मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. सोलापूर)
स्वप्ने वेगळी असावीत...!
आपल्या घरातील मुलींना प्रत्येक आई-वडिलांनी बळ देण्याची गरज आहे. मुलींनीही इतरांपेक्षा वेगळी स्वप्ने पाहिली पाहिजेत व ती पूर्ण करण्यासाठी जिद्द व चिकाटी ठेऊन स्वप्न साध्य केले पाहिजे, यासाठी कष्टाची तयारी ठेवली पाहिजे. पालकांनी आपल्या मुलींना त्यांची स्वप्ने साध्य करण्यासाठी शिस्तीची जोड घेऊन स्वातंत्र्य दिले पाहिजे, असं आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी उपस्थित माय-बाप अन् ग्रामस्थांना केले.