सोलापूर : सोलापूर पोलीस आयुक्तालय अंतर्गत विजापूर नाका पोलीस स्टेशनसह अन्य पोलीस ठाणे हद्दीत तसेच सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाणे हद्दीत सराईत गुन्हे करणारा गुन्हेगार गणेश कल्लप्पा माशाळकर (वय- २४ वर्षे, रा. लिमयेवाडी, साई मंदिर जवळ, रामवाडी, सोलापूर) याला त्याच्या गुन्हेगारीचा आलेख लक्षात घेऊन पोलीस आयुक्तालयाने त्यास सोलापूर शहर उर्वरित सोलापूर जिल्हा आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार केलंय.
गणेश माशाळकर याच्याविरुद्ध परिसरात गुंडगिरी करणे, शिवीगाळ दमदाटी व मारहाण करुन दहशत निर्माण करणे सदर परिसरातील लोकांच्या मालमत्तेस हानी पोहचविणे अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे एकुण ०६ गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याचेविरूध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५७ (१) (अ) प्रमाणे मा. पोलीस उपायुक्त परिमंडळ, यांचे आदेश पारित झाले होते. त्यास गुरुवारी, ०७ मार्च रोजी विजापूर नाका पोलीस स्टेशनकडून ताब्यात घेऊन सोलापूर शहर व उर्वरित सोलापुर जिल्हा व धाराशिव जिल्हातून दोन वर्षाकरीता तडीपार करण्यात आलंय.
आगामी काळात विविध जाती-धर्माचे सण-उत्सव, मिरवणुका व लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर शहर व परिसरात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, म्हणून शहरात कायदा व सुव्यवस्था तसेच शांतता अबाधित राहण्याच्या उद्देशाने पोलीस आयुक्तालयाने सराईत गुन्हेगाराविरुद्ध कारवाई करण्याच्या कामास गती दिली आहे. दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असणाऱ्या आरोपींच्या याद्याही तयार असून येत्या काळात अनेकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे यापूर्वीच सांगण्यात आलंय.
ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त (परिमंडळ) विजय कबाडे, सहा. पोलीस आयुक्त (विभाग ०२) अजय परमार,विजापुर नाका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी पवार, दुपोनि संगीता पाटील, पोसइ मुकेश गायकवाड, पोशि/१४८९ रमेश कोर्सेगांव यांनी केलीय.