सोलापूर : तू पांढऱ्या पायाची आहे, तू आमच्या घरी पाऊल ठेवल्यापासून आम्हाला दवाखाना लागला आहे, असा टोमणे देण्यापासून मारहाण करून एका विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात सासरच्या चौघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही छळ मालिका, फेब्रुवारी २०१९ ते सप्टेंबर २०२१ दरम्यान बसवंत तालुक्यातील मसबीनाळ येथे घडलाय. सौ. धनश्री अविनाश हिरेमठ (वय- २७ वर्षे) हिच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, विजापूर जिल्ह्यातील मसबीनाळ येथे सासरी नांदत असताना पती अविनाश, सासू सौ. सुवर्णा, सासरे शिवयोगी हिरेमठ आणि नणंद लक्ष्मी ऊर्फ अरुण हिरेमठ (सर्व रा. मु.पो. मसबीनाळ) यांनी संगनमताने सौ. धनश्री हिस किरकोळ कारणं शोधत तिच्या छळास प्रारंभ केला.
त्यातच दारूच्या आहारी गेलेला व्यसनी पती अविनाश हिरेमठ याला खोटे-नाटे सांगून वेळोवेळी शिवीगाळी, मारहाण करून शारिरीक व मानसिक छळ सुरु केला. त्यातच त्या घरात सासरे शिवयोगी हिरेमठ यांचा अपघात झाल्यावर, तू पांढऱ्या पायाची असल्यामुळे आमच्या मागे दवाखाना लागलाय असा आरोप करून शारीरिक व मानसिक छळ सुरुच ठेवला.
तुझा बाप अपघातात जखमी झाल्यावर जशी सेवा करशील तशी सेवा सासऱ्याची केली पाहिजे, म्हणून वरकरणी म्हटले जात असलं तरी नणंद लक्ष्मी ऊर्फ अरुण हिरेमठ हिला युकेला जाण्यासाठी माहेरून पैसे आण, अशा तगादा लावूनही ते सर्व जण त्रास देत होते. त्यातूनच जेवणाचे ताट फेकून देणे असेही प्रकार करीत होते.
सासरी छळ असह्य झाल्यावर सौ धनश्रीने माहेर जवळ केले. याप्रकरणी सौ. धनश्री (रा. सध्या ३४८, स्वामी विवेकानंद नगर, हत्तुरे वस्ती, सोलापूर) ने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार विजापूर नाका पोलिसांनी चौघांविरुद्ध भादवि ४९८ (अ), ३२३,५०४,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केलाय. पोलीस हवालदार बहिर्जे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.