Type Here to Get Search Results !

अमीर खान खून खटला : आरोपीस उच्च न्यायालयात जामीन



सोलापूर : विजापूर नाका परिसरातील चांद तारा मशीदजवळ १६ फेब्रुवारी २०२३ रोजी अमीर खान याचा पूर्व वैमनस्यावरून मारहाण करून खून केल्याच्या आरोपात अटकेत असलेला आरोपी रवी आठवले याने मुंबई उच्च न्यायालयात केलेल्या जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जामदार यांच्यासमोर होऊन न्यायमूर्तींनी आरोपी रवी आठवले याची जामिनावर मुक्तता केली.
       
या खटल्याची हकीकत अशी की, घटनेदिवशी आरोपी व त्याच्या साथीदारांनी आमिर खान यास मारहाण केली. त्या मारहाणीमुळे आमिर खान याचा मृत्यू झाला, अशा आशयाची फिर्याद आमिर खानचा भाऊ नासिर खान याने विजापूर नाका पोलीस स्टेशनला दाखल केली होती. आरोपीने केलेला जामीन अर्ज सोलापूर सत्र न्यायालयाने फेटाळून लावलेला होता. त्या निकालाविरुद्ध आरोपीने ॲड. जयदीप माने यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केलेला होता. 

सदर जामीन अर्जाच्या सुनावणी दरम्यान आरोपीचे वकील ॲड. जयदीप माने यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, मयत आमिर खान यास फिट येण्याचा आजार होता, घटनेदिवशी त्याचे डोके दुखत होते,  म्हणून त्यांने डोक्याला मलम लावला आणि त्यानंतर त्याला फिट येऊ लागल्यामुळे त्यास दवाखान्यात ॲडमिट केले उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 

पोलीस स्टेशनला दिलेल्या माहितीमध्ये त्याच्या भावाने असे सांगितले होते की, माझ्या भावास डोकेदुखीचा त्रास होता. त्याने मलम लावल्यानंतर त्याला फिट येऊ लागली, त्यामुळे त्याला दवाखान्यात ऍडमिट केले. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला, परंतु सदरची बाब लपवून ठेऊन फिर्यादीने ०२ दिवसानंतर पूर्ववैमानस्यावरून खोटी फिर्याद दिलेली आहे, असा युक्तिवाद केला.

 न्यायमुर्तींनी आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केला, त्यास विजापूर नाका पोलीस स्टेशनला हजेरी देणे व पासपोर्ट पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्याच्या अटीवर जामिनावर मुक्तता केली.

या प्रकरणी आरोपीतर्फे ॲड. जयदीप माने ,ॲड. कुमार उघडे यांनी तर सरकारतर्फे ॲड. श्रीमती एस. एस. कौशिक यांनी काम पाहिले.