सोलापूर : आजमितीला भारत हा पोलिओ मुक्त देश आहे, मात्र काही देशामध्ये पोलिओ अजूनही आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत ५ वर्षाखालील बालकांना पोलिओ डोस देण्याचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले असून आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. तरी जिह्यातील नागरिकांनी जागृत राहून रविवारी, ३ मार्च रोजी आपल्या बालकांना पोलिओचा डोस अवश्य द्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी केलं आहे.
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविणेबाबत शासनाकडून मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या आहेत. याबाबतची सुकाणू समिती सभा जिल्हाधिकारी, सोलापूर यांचे उपस्थितीत ३१ जानेवारी २०२४ रोजी घेण्यात आली होती. सदर सभेला डॉ. संतोष नवले, जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ सुहास माने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अनिरुद्ध पिंपळे, माता बाल संगोपन अधिकारी व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी सोलापूर जिल्ह्यात ० ते ५ वयोगटातील ४५०३४३ बालके असून एकही पाच वर्षाखालील बालक पोलिओ लसीपासून वंचीत राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेची व्यापक प्रसिद्धी करण्यात यावी दर्शनी ठिकाणी मोहिमेचे Banner तयार करून लावण्यात यावेत व मोहिमेची प्रभावीपणे अंमलबजावणी करून सदर मोहीम १०० टक्के यशस्वी करावी, अशा सूचना दिलेल्या आहेत
पल्स पोलिओ डोस पासून एकही बालक वंचित राहू नये, याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यामध्ये ३१२४ लसीकरण केंद्र स्थापन केली असून ते ५ वयोगटातील ४५०३४३ बालकांना लसीकरण करण्यात येणार आहे. पोलिओ लसीकरण करण्यासाठी प्रत्येक गाव पाड्यावर पोहचून लस पाजण्यासाठी १९६ ट्रान्झीट टीम व मोबाईल टीम १३९ कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. ७७ प्रा आ केंद्र व ४२७ उपकेंद्र तसेच ७५११ आरोग्य कर्मचारी, आशा, अंगणवाडी कर्मचारी ६०१ पर्यवेक्षक याचे माध्यमातून मोहिमेचे नियोजन केले असल्याचे जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे यानी सांगीतले.
पल्स पोलिओ लसीकरण दिनाच्या दिनाच्या दिवशी डोस देण्यात आला नसेल तर वंचित राहिलेल्या बालकांना गृहभेटी दरम्यान पोलिओ डोस देण्याचा कार्यक्रम ग्रामीण भागात ५ ते ७ मार्च २०२४ (३ दिवस ) शहरी भागात दिनांक ५ ते ९ मार्च २०२४ (५ दिवस) पर्यंत देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.