Type Here to Get Search Results !

बुधवारी सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसची भव्य पदयात्रा चिन्ह 'तुतारी वाजविणारा माणूस' रुजविण्याच्या प्रयत्न



सोलापूर/रमजान मुलाणी : 

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार मिळालेले नवीन निवडणूक चिन्ह 'तुतारी वाजविणारा माणूस' नागरिकांपर्यंत घेऊन जाणे व ते जनतेत रुजविण्याच्या हेतूने बुधवारी, ६ मार्च रोजी सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भव्य पदयात्रा काढण्यात येत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी शनिवारी सकाळी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

शरदचंद्र पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना, १९९९ मध्ये केली. त्यांनी संपूर्ण देशामध्ये पक्ष वाढीसाठी कामे केली तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ऊर्जा दिली त्यांना महत्त्वाचे पदे देऊन मोठे केले. सर्वधर्मसमभाव व पुरोगामी विचारसरणीशी त्यांनी कधीच तडजोड केली नाही. अशा स्थितीत पक्षात दोन गट पडले सत्तेच्या लालसेपोटी अजित पवार भाजपशी हात मिळवणी करून सत्तास्थानी गेले, त्यावेळी देश व राज्यातील ८० टक्के पदाधिकारी कार्यकर्ते शरदचंद्र पवार यांच्याबरोबर राहिलेले असताना निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयामुळे राष्ट्रवादीचे निवडणूक चिन्ह अजित पवार यांना दिले हा निर्णय चुकीचा होता असे प्रारंभी शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले.

अशाही स्थितीत शरदचंद्र पवार यांनी तसूभरही न डगमगता, निवडणूक आयोगाने दिलेले तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाचे रायगडावर जाऊन शानदार उद्घाटन केले. त्याच उत्साहाने सुरुवात केली. त्यांचे राज्यभर दौरे चालू आहेत. त्यांनी राजकारणात टीका करताना आपल्या मर्यादा कधीही ओलांडलेल्या नाहीत, ज्येष्ठ नेत्यासोबत सामान्य जनतेची सहानुभूती तर आहेच पण पक्षात काम करणारे पदाधिकारी व कार्यकर्ते स्वाभिमानाने त्यांच्यासोबत आहेत, असं शहराध्यक्ष खरटमल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांनी उद्घाटन केलेले निवडणूक चिन्ह सामान्यांपर्यंत घेऊन जाण्यासाठी बुधवारी, कोंतम चौक, मधला मारुती, माणिक चौक, सोन्या मारुती, नवी पेठ मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत भव्य पदयात्रा काढण्यात येत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांनी एकत्र येऊन भाजपाचा पराभव करणे अगत्याचे आहे, या अनुषंगाने शनिवारी सायंकाळी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षासोबत बैठक घेण्यात येत असून लोकसभा व अन्य निवडणुकीसाठी तयारीबाबत विचार विनिमय करून निर्णय घेण्यात येणार असल्याचेही शेवटी खरटमल यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेस ज्येष्ठ नेते अॅडवोकेट यू. एन. बेरिया, तौफिक शेख, महेश कोठे, प्रमोद गायकवाड यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.