सोलापूर : गेल्या वर्षभरापासून ब्राह्मण समाजावर सातत्याने टीका केली जात आहे. समाजाची हेटाळणी केली जात आहे. त्यामुळे ब्राह्मण समाजामध्ये अस्वस्थतेचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याला प्रतिबंध होण्यासाठी ब्राह्मण समाजाला संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आलीय.
यासाठी ब्राह्मण समाजाला अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील तरतुदीप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची परवानगी मिळावी, विशेष बाब म्हणून ब्राह्मण समाजातील ज्या व्यक्ती शस्त्र परवान्याची मागणी करतील, त्यांना तातडीने देण्यात यावा, अशी मागणी ब्राह्मण समाजातर्फे या निवेदनात करण्यात आली आहे.
कुणाच्याही अध्यात-मध्यात नसणाऱ्या ब्राह्मण समाजाला अलीकडील काळात विनाकारण धमकावणी दिली जात आहे. या समाजासंबंधी असंसदीय भाषा वापरली जात आहे. त्यामुळे समाजात भयाचे वातावरण निर्माण झालं आहे.
राज्यात सध्या समाजात दुहीचे विष पेरून असंतोष पसरवण्यासाठी काही व्यक्ती आणि संघटनांकडून जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत. ब्राह्मण समाज हा मुख्यतः बुद्धिजीवी आणि शांतता प्रिय समाज आहे. तमाम जनतेच्या हितासाठी ब्राह्मण समाजातील अनेक व्यक्तींनी तन-मन-धनाने आणि कोणतीही अपेक्षा न ठेवता उत्तम सेवा केली आहे आणि करतही आहे, असा उल्लेख या निवेदनात करण्यात आलाय.
या समाजातील कोणाही व्यक्तीने कोणत्याही समाजास कसल्याही प्रकारे नुकसान पोहोचविलेले नाही. ही वस्तुस्थिती असताना इतर समाजातील काही व्यक्ती व संघटना अल्पसंख्य असणाऱ्या ब्राह्मण समाजाबद्दल विनाकारण बदनामीकारक वक्तव्य करून तमाम ब्राह्मण समाजास धमकावणी देत आहे. त्यामुळे लोक प्रतिनिधी या नात्याने ब्राह्मण समाजास संरक्षण मिळावं, यासाठी कायद्यामध्ये तरतुदी कराव्यात, असे या निवेदनात म्हटलं आहे.
यावेळी बजरंग कुलकर्णी, विक्रम ढोनसळे, अमृता गोसावी, मीनाताई चाटी, संपदा जोशी, रामचंद्र तळवळकर, दत्तात्रय आराध्ये, सुहास देशपांडे, वामन कुलकर्णी, मुकुंद मुळेगांवकर, भरत काटीकर, संतोष पंतोजी यांच्यासह ब्राह्मण समाजातील अनेक व्यक्ती उपस्थित होत्या.