Type Here to Get Search Results !

दीन-दु:खितांना मदत करा

 


रमजानुल मुबारक - ८

दीन-दु:खितांना मदत करा       

मजान महिन्यातील केले जाणारे प्रत्येक कार्य पुण्यप्राप्ती करुन देणारे, एकमेकांना सहाय्य करणारे, गोर गरीब, दीन, दलित, अनाथ, विधवा गरजूंना मदत करणारे असते. समाजातील विविध घटकांच्या समस्यांची जाणिव रमजानच्या रोजातून होते. समाजात आपल्या आसपास जे लोक राहतात, त्यापैकी काही गरीब आहेत, गरजू आहेत, कुणी आजारी आहेत, कुणाच्या घरात खायला नाही, कुणी अनाथ आहेत, बेसहारा आहेत, वृध्द आहेत. अशा लोकांच्या विविध समस्या सोडविणारा कुणी नाही. अशा घटकांना सामाजिक जाणिव व माणुसकीच्या भावनेतून आपण मदत केली पाहिजे. ही वृत्ती रोजामुळे निर्माण होते.

भूकेची जाणिव होऊन भुकेल्याबद्दल सहानुभूती निर्माण होऊन अशा घटकांना मदत केली पाहिजे, ही भावना उदयास येते. गरीबांना ही अन्न, पाणी, निवारा आवश्यक आहे, त्यांनाही कपडे दिले पाहिजे, आजारी रुग्णांना मदत केली पाहिजे, अशा प्रकारच्या जाणिवा रोजा मुळे कळतात व त्यातूनच मदतीचा हात पुढे येतो. 

हजरत पैगंबरांनी समाजातील अशा घटकांना शक्य तेवढी मदत करण्याची शिकवण दिली आहे. भौतिक सुखाच्या मागे धावतांना आज माणुसकीचं नातं लोप पावत आहे. भाऊ भावाला विचारीत नाही, ज्यांनी काबाडकष्ट करुन आपल्याला मोठे केले, अशा माता-पित्यांना न विचारणारे, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणारे भरपूर लोक समाजात आहेत. अशा वेळी अशा घटकांना मदतीचा हात देण्याची गरज असते. रोजातून हीच भावना निर्माण होते. 

आपण प्रगतीची खूप शिखरं सर केली असली तरी अधोगतीच्या दऱ्यादेखील निर्माण केल्या आहेत. आई घरात मरुन पडली तरी देखील तिच्याकडे न पाहणारे किंवा अमेरिकेत मुलाला पाठविण्यासाठी अहोरात्र कष्ट करणारा बाप जेव्हा मेला, तेव्हा त्या बापाच्या अंतिम संस्कारांसाठी वेळ नसणारा मुलगा आपल्या समाजाने अनुभवला आहे. 

प्रगती म्हणजे नात्यांचा विसर नव्हे तर नात्यांना सांभाळून पुढे जाण्याचा मार्ग म्हणजे प्रगती. ही वैचारिक शृंखला रोजा मुळे गुंफली जाते. व्यक्तींच्या समूहातून समाज अस्तित्वात येतो. आपले सुख-दुःख हे समाजाचेही सुख-दुःख असते. अशा वेळी आपण मदत केली पाहिजे, ही शिकवण रोजा मधून मिळत असते. 

आपल्या सारखी तहान, भूक, थकवा, ग्लानी इतरांनाही आली असेल, जे आपल्याकडं आहे, ते इतरांकडे असेल का? हा प्रश्न मनात निर्माण होऊन मदतीची भावना निर्माण होते. समाजातील असे अनेक हात मदतीसाठी पुढे येतात व गरजू घटकांच्या गरजा पूर्ण होतात. प्रत्येक धर्मात अशा प्रकारची मदत करणारे हजारो हात परमेश्वराने निर्माण केले आहेत व ते आपल्या परीने मदत करीत असतात. यालाच पुण्यवान म्हणतात.

रमजान महिन्याचा संदेश हाच आहे कि, स्वतःसाठी जगतांना इतरांसाठी ही जगा. आपल्या कौटुंबिक गरजा पूर्ण करतांना आपल्या शेजारी परिसरात जे गोरगरीब आहेत त्यांना ही मदत करा, तरच तुम्ही यशस्वी व्हाल, अन्यथा तुम्हाला येथे केलेल्या प्रत्येक कृत्याचा हिशोब कयामतच्या दिवशी द्यावाच लागेल. (क्रमशः)

सलीमखान पठाण

 9226408082.