सोलापूर : पोकलेन मशिन व ब्रेकर भाड्याने नेऊन सुमारे ३७ लाख रुपयांहून अधिक किंमतीची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलाय. ही घटना नोव्हेंबर २०२३ ते कालदरम्यान घडलीय. याप्रकरणी सांगलीच्या ठकसेनाविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, विजापूर रस्ता, सैफुल परिसरातील वैष्णवी नगरातील रहिवासी सुनिलराणा बाबुराव जगताप-पाटील ज्यांना सांगली येथून सतिश चव्हाण नावाच्या व्यक्तीने ०२ नोव्हेंबर २०२३ रोजी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधत, जगताप- पाटील यांच्याकडे त्यांच्या मालकीचे सुमारे ३५ लाख रुपये किमतीचे पोकलेन व ०२ लाख रुपये किंमतीचे ब्रेकर अशी ३७ लाख रूपये किंमतीच्या यंत्रसामुग्रीला दर महिना o२.१० लाख रुपये भाडे देण्याची तयारी दर्शवत भाड्याने मागितली.
०७ नोव्हेंबर दरम्यान उभयतांत झालेल्या बोलणीतून विश्वास संपादन होऊन सुनीलराणा जगताप-पाटील यांनी सांगलीकडून आलेल्या ट्रेलरमध्ये पोकलेन मशीन व ब्रेकर सोरेगाव एस आर पी कॅम्प जवळील मोकळ्या मैदानात भरून सांगलीकडे पाठवून दिला. तेव्हापासून आजपर्यंत सतिश चव्हाण याने पोकलेन मशिन व ब्रेकरसाठी दर माही ठरलेले भाडे दिले नाही, त्याहून पुढे जाऊन ती यंत्रसामग्री कोठे आहे, हेही सांगितले नाही.
याप्रकरणी सतीश चव्हाण या व्यक्तीने 37 लाख रुपये किमतीची यंत्रसामग्री भाड्याने नेऊन विश्वासघात करून फसवणूक केल्याप्रकरणी सुनील राणा जगताप पाटील यांनी त्याच्याविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात शुक्रवारी, ०८ मार्च रोजी सकाळी फिर्याद दाखल केलीय. त्यानुसार सांगलीच्या ठकसेनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक तरंगे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.
.jpeg)