सोलापूर : शहरात जमावबंदीचा आदेश लागू असताना मौलाली चौक येथे बेकायदेशिररित्या जमाव जमवून मोटार सायकल रॅली काढून जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी ए आय एम आय एम पक्षाचे माजी नगरसेवक गाझी सादिक जहागीरदार यांच्यासह इतरांविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, बुधवारी 6 मार्च रोजी सायंकाळी माजी नगरसेवक गाजी जहागीरदार यांनी मौलाली चौकात त्यांच्या समर्थकांना एकत्रित जमवून मौलाली चौक ते शिवछत्रपती रंगभवनपर्यंत मोटार सायकल रॅली काढली. सोलापूर पोलीस आयुक्तालय हद्दीत जमावबंदी शस्त्रबंदीचे आदेश जारी असताना या रॅलीत त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.
याप्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले पोलीस हवालदार नितेश रमेश काळे/१९३४ यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. ती रॅली मौलाली चौक, लष्कर, सातरस्ता मार्गे मोठमोठ्याने घोषणाबाजी करीत सार्वजनिक रहदारीस अडथळा येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना मज्जाव करून उपद्रव करीत रंगभवन चौकापर्यंत विनापरवाना/बेकायदेशीर काढल्याचे म्हटले आहे.
त्यानुसार गाझी सादीक जहागिरदार, कमरोद्दीन ऊर्फ कम्मो सल्लाउद्दीन शेख, शोएब चौधरी, मोहसीन मैदर्गिकर, बाबा पिरअहमद शेख, मोईल कुरेशी, जावेद नाईकवाडी, शहाबाज बागवान, मजहर कोरबू, बाबा पठाण, अब्बु, दादू सालार, अमिर साहेल, सुलतान शेख यांच्यासह अन्य ५० ते ६० कार्यकर्त्यांविरुद्ध भादवि १८८,१४३,३४१,२६८ सह महा.पो.का १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. सहाय्यक फौजदार शेख या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.