सोलापूर : ज्येष्ठ पत्रकार दिलीप दादाराव शिंदे यांनी भारतीय जनता पार्टीकडे सोलापूर राखीव लोकसभा मतदार संघात उमेदवारी मागितलीय. यापूर्वी राज्यातील प्रदेश पातळीवर अनेक पदाधिकाऱ्यांची भेट घेतलीय. त्यांनी राजधानी दिल्लीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षांचीही भेट घेऊन निवडणूक लढण्याची इच्छा प्रदर्शित केलीय. दिलीप शिंदे यांनी शनिवारी, १६ मार्च रोजी सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचीही भेट घेतलीय.
ज्येष्ठ पत्रकार तथा दैनिक नालंदा एक्सप्रेसचे संपादक दिलीप दादाराव शिंदे यांचा पत्रकारिता क्षेत्रातील जवळपास दोन दशकांचा प्रवास आहे. या पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील दीन-मागास आणि तळागाळातील जनतेचे प्रश्न सोडविण्यावर त्यांचा भर राहिला आहे. ते मूळतः दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे कर्देहळ्ळी गावातून शहराकडे आले असून त्यांची ग्रामीण जीवनाशी जन्मतःच नाळ जुळलेली आहे.
दिलीप शिंदे महाविद्यालयीन जीवनात असताना, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय पातळीवरील नेते अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि प्रमोद महाजन यांच्या राष्ट्र विचाराने प्रभावित होऊन दोन दशकापूर्वीपासून भाजपचा सामान्य कार्यकर्ता म्हणून पक्षीय कार्यास प्रारंभ केला होता. त्यांनी भाजपाचा अनुसूचित जाती-जमाती मोर्चा अध्यक्ष म्हणूनही शहर आणि जिल्हा पातळीवर पक्ष कार्य केलं आहे.
भाजपाचे राष्ट्रीय नेते स्व. प्रमोद महाजन यांच्याशी त्यांचे निकटवर्तीय संबंध होते. या संपूर्ण वाटचालीत दिलीप शिंदे यांनी पक्षानं सोपविलेली प्रत्येक जबाबदारी निरपेक्ष आणि प्रामाणिक भावनेने पार पाडली, हे जनसामान्यांच्या आजही स्मरणात आहे. शिंदे यांच्या सर्व समाज घटकांशी तीन दशकाचा भाजप पक्ष कार्यकर्ता आणि ज्येष्ठ पत्रकार अशी दुहेरी विण आहे. शहरी जीवनातही ग्रामीण मातीशी नातं कायम आहे. त्यामुळं ते सर्वदूर परिचीत आहेत. जनसामान्यांच्या दांडग्या संपर्काच्या बळावरच, पक्षाकडं लोकसभेच्या उमेदवारीची मागणी शिंदे करीत आहेत.
ज्येष्ठ पत्रकार दिलीप शिंदे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं, त्यांच्या ' सागर ' बंगला निवासस्थानी जाऊन चर्चेसाठी वेळ मागितली. शिंदे यांना शनिवारी सकाळची वेळ मिळाली होती. त्यानुसार त्यांच्यासमवेत चर्चा झाली. या चर्चेत दिलीप शिंदे यांनाच पक्षानं उमेदवारी का द्यावी, यावर चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी, त्यांना दहा मिनिटाचा वेळ दिला.
यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी शिंदे यांचं म्हणणं सविस्तर ऐकून घेतले. अगदी सुरुवातीच्या दिवसांपासून निष्ठेने पक्षकार्य , मंत्रालय पत्रकारितेचा सुमारे सोळा वर्षांचा अनुभव, सोलापूरच्या प्रश्नांची जाण, सोलापूर विकासाचं व्हिजन, सर्व समाजाशी चांगले संबंध, राजकारण आणि समाजकारणात निष्कलंक प्रतिमा, या सर्व बाबी उपमुख्यांच्या निदर्शनास आणून दिल्याचेही समजते.
सन १९९० पासून भारतीय जनता पार्टीमध्ये स्व. प्रमोदजी महाजन, स्व. लिंगराजजी वल्याळ, आ. विजयकुमार देशमुख, किशोरजी देशपांडे, मोहिनी पत्की, नरसिंग मेंगजी यांच्यासोबत पक्ष कार्य केलेला मी जुना कार्यकर्ता असल्याचेही शिंदे यांनी उपमुख्यमंत्र्यांना चर्चेदरम्यान सांगितले.
बूथ यंत्रणेपासून मोठ्या सभा लावण्यापर्यंतचे काम, पक्षाच्या ध्येय-धोरणाशी बांधीलकी. तसेच पक्षाच्या विविध यंत्रणेत काम केले असल्याचे उपमुख्यमंत्र्यांसमोर ठेवताना, दिलीप शिंदे हिंदू महार बौद्ध वर्गातील असल्याने सोलापूर लोकसभा मतदारसंघात या वर्गाचा मताचा टक्का अधिक आहे. या समाजाची अधिकाधिक मते मिळतील, समाजामध्ये चांगले काम आहे. तसेच इतर ठिकाणचे मतेही मला मिळू शकतात, असं शिंदे यांनी सांगितल्याचे समजते.
महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. यामध्ये सोलापूरसारख्या एका मतदारसंघात पत्रकार म्हणून शिंदे यांना उमेदवारी दिल्यास संपूर्ण महाराष्ट्राच्या पत्रकारितेमध्ये आनंदच होईल, असंही शिंदे यांनी या भेटीत उपमुख्यमंत्र्यांशी बोलताना म्हटलंय.
विकासाच्या मुद्यावर दूरदृष्टी ठेऊन काही प्रोजेक्ट संकल्पना मांडली आहेत. सोलापूरच्या विकासासंदर्भात माझ्याकडे ब्लू प्रिंट आहे. ते विकासाचे व्हिजन घेऊन निवडणूक लढविण्यास इच्छुक असून पक्षानं संधी द्यावी, असंही आवर्जून सांगितलंय. त्यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी येत्या दोन दिवसात राष्ट्रीय पातळीवर निर्णय होणार असून उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी शिंदे यांच्या मागणीशी सकारात्मकता दर्शविलीय.