Type Here to Get Search Results !

रमजानुल मुबारक - ६ रोजा - मोमीनासाठी ढाल

 

रमजान महिना हा रोजा अर्थात उपवासासाठी प्रसिद्ध आहे. महिनाभराचे रोजे फर्ज आहेत. कोणत्याही कारणास्तव त्यात सूट नाही. प्रत्येक सज्ञान स्त्री-पुरुषांनी ते केले पाहिजे. रोजे किंवा उपवास म्हणजे केवळ उपाशी राहणे नव्हे. तर शरीराशी निगडित प्रत्येक बाबीशी रोज्याचा निकटचा संबंध आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत न खाता-पिता उपाशी राहिला म्हणून त्याचा रोजा झाला, असे अजिबात नाही.

रोजा प्रत्येक वाईट गोष्टींपासून थांबविण्याचे काम करतो. व्यक्तीच्या प्रत्येक अंगाशी तो निगडित आहे. रोजाचा मुख्य उद्देश खोटे बोलणे आणि द्वेष यापासून दूर ठेवणे हा आहे. रोजा ठेऊन जर कोणी व्यापारी आपला व्यापार करण्यासाठी खोटं बोलत असेल, वस्तू विकण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खोटं बोलत असेल, लोकांना फसवत असेल तर अशा व्यक्तीला रोजा ठेवण्याची गरज नाही. 

तसेच जर कोणी एकमेकाचा द्वेष करीत असेल कोणतेही कारण नसताना एकमेकाची बदनामी करीत असेल, नको त्या गोष्टी पसरवून समाजामध्ये एखाद्या व्यक्तीबद्दल गैरसमज निर्माण करून देत असेल, विनाकारण द्वेष करून मत्सर व्यक्त करीत असेल तर अशा लोकांचे रोजे काही कामाचे नाहीत. 

अशा सर्व चुकीच्या बाबी पासून परावृत्त करण्याचे कार्य रोजा करीत असतो. ज्या-ज्या ठिकाणी माणसांचा माणसांशी संबंध येतो, त्या त्या ठिकाणी खोटं बोलणं वर्ज्य आहे. याची जाणीव ठेऊन प्रत्येकाने वागले पाहिजे, तरच त्याच्या 'रोजा' ला अर्थ आहे.जर या गोष्टी पासून तो परावृत्त होत नसेल तर त्याचा रोजा म्हणजे फक्त उपासमार शिवाय दुसरे काही नाही. 


हजरत प्रेषित पैगंबर यांनी म्हटले आहे कि, रोजा मोमिनासाठी ढाल आहे. लढाईमध्ये ढाल शत्रूपासून संरक्षणासाठी वापरली जाते. रोजाचा प्रमुख शत्रू शैतान आहे आणि शैतान दु:ष्कृत्ये करण्यासाठी सतत प्रवृत्त करीत असतो. खोटं बोलून किंवा द्वेष करून आपण त्याच्या आमिषाला बळी पडत असतो. 

अशा आमिषापासून रोखण्याचे कार्य रोजामध्ये होते आणि म्हणून रोजा धरल्यानंतर आपल्याकडून कोणत्याही प्रकरणात खोटेपणा होणार नाही किंवा कुणाचा द्वेष होणार नाही, याची काळजी घेणे हे प्रत्येक रोजादाराचे कर्तव्य आहे.

दैनंदिन जीवनामध्ये अनेक प्रसंगी लोक खोटं बोलतात. त्यातून तात्पुरता त्यांचा हेतू साध्य होत असला तरी हे खोटं कधी न कधी उघडं पडतं, म्हणून खोटं कधीही बोलू नये. व्यवहारात, वागण्यात, बोलण्यात किंवा अन्य कोणत्याही प्रकारात खोटे बोलण्यापासून दूर राहावे. कारण खोटं म्हणजे झूठ हे सर्व प्रकरणांचा मूळ आहे. 

एकदा खोटेपणा उघड झाला तर अशा व्यक्तीची विश्वासार्हता राहत नाही. आपला विश्वास कायम ठेवणे, हे प्रत्येक व्यक्तिमत्त्वाचं कर्तव्य आहे. व्यक्तिमत्व विकासाचे साधन म्हणूनही रोजा परिचित आहे. (क्रमशः)

 सलीमखान पठाण

  9226408082