(प्रतिकात्मक छायाचित्र)
सोलापूर : चालकाची हयगय आणि निष्काळजीपणामुळे क्रेनची धडक लागून पादचाऱ्याचा मृत्यू झाला. ही दुर्घटना आम्रपाली चौकात मंगळवारी, १२ मार्च रोजी सकाळी ९ वा. च्या सुमारास घडलीय. पांडुरंग दामोदर गुर्रम (वय-५० वर्षे) असं मृताचं नांव आहे. त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अब्बासअली नुरअहमद मुजावर याच्याविरूध्द जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, न्यू पाच्छा पेठेतील पंचमुखी मारुती मंदिराजवळील रहिवासी पांडुरंग दामोदर गुर्रम पायी चालत रस्ता ओलांडत असताना, आम्रपाली चौकाकडून अशोक चौकाकडे जाणाऱ्या क्रेनची (एम एच १३ / डी एम ५३८२) पाठीमागून धडक लागून डोकीस गंभीर दुखापत झाल्याने त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी मृताचे मेहुणे पांडुरंग संजीव कटकट यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार क्रेन चालक अब्बासअली नुरअहमद मुजावर (रा. ६६४, स्वामी विवेकानंद नगर, हत्तुरे वस्ती, सोलापूर) याच्याविरुध्द भादवि ३०४(अ), २७९, मोवाकाक १८४/१७७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस हवालदार/१२५७ कांबळे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.