०९.२८ लाख रुपये किंमतीचा गुटखा आणि प्रतिबंधित तंबाखूचा साठा जप्त

shivrajya patra

                                                                                      (प्रतीकात्मक छायाचित्र)

सोलापूर : राज्यात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू च्या गोडाऊनवर अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकलाय. छाप्यात सरकारी किंमतीनुसार जवळपास ०९.२८ लाख रुपये किमतीचा गुटखा आणि प्रतिबंधित तंबाखू अन्न व औषध प्रशासनाच्या हाती लागला आहे. गुटखा माफिया महांतेश सिद्राम गुब्याडकर (वय- ३७ वर्षे) याच्याविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सोलापूर शहरात गुटखा माफीयांचे पाळेमुळे खोलवर रुतल्याचे या छाप्यानंतर उजेडात आलंय.

येथील अन्न व औषध प्रशासनातील रेणुका रमेश पाटील आणि त्यांच्या पथकाने शेळगी रस्त्यावरील भवानी पेठेतील रहिवासी महांतेश गुब्याडकर याच्या राहत्या घरी आणि भवानी पेठेतील वैदुवाडी परिसरातील भाड्याने घेतलेल्या गोडाऊनमध्ये बुधवारी दुपारी तीन वाजता सुमारास छापे टाकले. या छाप्यात रजनीगंधा पानमसाला, राजू इलायची सुपारी, बाबा नवरतन पानमसाला, बाबा १२० तंबाखू, शुध्द प्लस पानमसाला, विना लेबल पानमसाला, आरएमडी पानमसाला, एम सुगंधीत तंबाखू आदी प्रतिबंधित मालाचा साठा आढळून आला. त्याची सरकारी किंमत ९,२८,७४५ रुपयांहून अधिक असल्याचे सांगण्यात आले.

गुटखा माफिया महांतेश सिद्राम गुब्याडकर याने महाराष्ट्र राज्यात गुटखा उत्पादन वाहतूक साठा आणि विक्रीवर अन्न सुरक्षा आयुक्त व औषध प्रशासन, मुंबई यांचे बंदीचे आदेश असताना, त्याचा भंग करून आर्थिक लाभ मिळविण्याच्या उद्देशाने या प्रतिबंधित मालाचा साठा करून ठेवल्याचे आढळून आले.

याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाच्या रेणुका रमेश पाटील यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार महांतेश सिद्राम गुब्याडकर याच्याविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार भादवि १८८,२७२,२७३,३२८, अन्न सुरक्षा व मानदे कायदा कलम २६(२) (i), २६(२) (ii), २६ (२) (iv), ३७ (३) (E), ३० (२) (A),५९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.


To Top