Type Here to Get Search Results !

मुंबई विद्यापीठ प्राध्यापक संघटना बुक्टू च्या उपाध्यक्षपदी प्रा. विनोदसिंह पाटील यांची बिनविरोध निवड



मुंबई : प्रा. विनोदसिंह पाटील यांची मुंबई विद्यापीठ प्राध्यापक संघटना बुक्टू च्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झालीय. प्रा. विनोदसिंह पाटील हे मूळचे सैनिक टाकळीचे असून ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोंडाघाट महाविद्यालयात इंग्रजी विषयाचे प्राध्यापक म्हणून गेली २७ वर्ष इंग्रजी भाषा व साहित्यचे शिक्षक म्हणून ज्ञानसेवा करत आहेत. 

त्यांचं प्राथमिक शिक्षण जीवन शिक्षण विद्यामंदिरमध्ये व माध्यमिक शिक्षण छत्रपती शिवाजी हायस्कूल टाकळी येथे झाले. कुरुंदवाड मधील श्री दत्त महाविद्यालय व सहकारभूषण डॉ. एस. के. पाटील महाविद्यालयातून पदवी प्राप्त करून शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मधून पदव्युत्तर शिक्षण घेतले. नंतर त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून एम. फिल पदवी प्राप्त केली. 

शिक्षण क्षेत्रातील व प्राध्यापकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी गेली १८ वर्षे ते बुक्टु प्राध्यापक संघटनेच्या माध्यमातून कार्यरत आहेत. सहावा व सातवा वेतन आयोग, नेट सेट मुक्त प्राध्यापकांचा संघर्ष, जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा लढा, तसेच शिक्षण बचाव मंच सिंधुदुर्गची स्थापना करून पालकांच्या, विद्यार्थ्यांच्या व अंगणवाडी पासून महाविद्यालयीन शिक्षक यांच्या हिताच्या अनेक शैक्षणिक प्रश्नावरील लढ्यात ते सहभागी झाले आहेत. 

आरोग्य क्षेत्रातील आशा वर्कर्स व गटप्रवर्तक यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सीटू संघटना बांधून, त्यांनाही न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी निरंतर प्रयत्न करत आहेत. त्यांच्या न्यायासाठी संघर्ष करताना पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हेही दाखल केले होते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, समतावादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही जनचळवळीत ते हिरीरीने भाग घेत असतात. त्यांनी शैक्षणिक, सामाजिक व व्यक्तिमत्व विकास विषयावरील अनेक व्याख्याने दिलेली आहेत. 

प्राथमिक ते उच्च शिक्षण सर्वांना समान, गुणवत्तापूर्ण, मोफत मिळाले पाहिजे, समाजातील जातीभेद, वर्गभेद, लिंगभेद व एकूणच विषमता नष्ट होऊन समता प्रस्थापित झाली पाहिजे, अंधश्रद्धा मुक्त समाज निर्माण झाला पाहिजे व शहीद भगतसिंग यांनी म्हटल्याप्रमाणे शेतकरी व कामगारांच्या हिताचे राज्य स्थापन झाले पाहिजे, हेच त्यांचे अंतिम उद्दिष्ट आहे. त्यांची बुक्टुच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्यामुळे प्राध्यापक तसेच समाजातील सर्व घटकांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.