Type Here to Get Search Results !

शेतकऱ्यांनो सावधान ! वाढीव मोबदला मिळवून देतो म्हणणाऱ्यांच्या भूलथापांना बळी पडू नये : जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद



सोलापूर : सोलापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्ग भूसंपादन, संत तुकाराम पालखी महामार्ग, सुरत-चेन्नई महामार्ग व अन्य प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रक्रिया सुरू आहे. या सर्व भूसंपादनाचा वाढीव मोबदला मिळवून देतो, असे काही लोकांकडून शेतकऱ्यांना चुकीची माहिती दिली जात आहे किंवा वाढीव मोबदल्याचे आमिष दाखवले जात आहे. तरी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोलापूर उस्मानाबाद रेल्वे मार्ग, सुरत चेन्नई महामार्ग भूसंपादन प्रक्रियेत शासकीय नियमाप्रमाणे जो मोबदला देय आहे, तोच मोबदला मिळणार आहे. तरी शेतकऱ्यांनी वाढीव मोबदला मिळवून देतो म्हणणाऱ्याच्या भूलथापांना संबंधित बळी पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की, सोलापूर उस्मानाबाद रेल्वे मार्ग, सुरत चेन्नई महामार्ग व अन्य प्रकल्प अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील भूसंपादन प्रक्रियेच्या अनुषंगाने काही लोकांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल सुरू असल्याची माहिती प्रशासनाला प्राप्त झालेली आहे. भूसंपादन कायदा २०१३ नुसार वाढीव मोबदला देण्याचा अधिकार जिल्हाधिकारी, भूसंपादन अधिकारी किंवा इतर कोणत्याही व्यक्तीला नाही. 


ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी महामार्गासाठी भूसंपादित करण्यात येत आहेत त्यांना भूसंपादन कायद्यातील तरतुदीप्रमाणे मोबदला खात्रीशीरपणे मिळणार आहे. तरी जिल्ह्यातील संबंधित रेल्वेमार्ग, महामार्ग भूसंपादन प्रक्रियेतील शेतकऱ्यांनी वाढीव मोबदला देतो म्हणून सांगणाऱ्याच्या भूलथापांना बळी पडू नये व स्वतःची फसवणूक करून घेऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.

 तसेच काही लोक शेतकऱ्यांना भूसंपादन कायद्याप्रमाणे मोबदला मिळणार असला तरी कमी मोबदला मिळणार असून आपण जास्तीचा मोबदला मिळवून देतो, असे सांगत आहेत. तरी कायद्याप्रमाणे जेवढा मोबदला मिळणार आहे,तेवढा बदला शेतकऱ्यांना खात्रीशीरपणे मिळणार आहे, याची नोंद घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील कोणत्याही शेतकऱ्यांची अशी फसवणूक करणाऱ्या संबंधित लोकांविषयी तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयातील ०२१७/२७३१००० या दूरध्वनी क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी केले आहे. तसेच शेतकऱ्यांची तक्रार प्राप्त झाल्यावर तात्काळ संबंधित फसवणूक करणाऱ्या किंवा चुकीची माहिती देणाऱ्या व्यक्ती विरोधात प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी निर्देशित केले आहे.


......... चौकट ........

'या' दूरध्वनी क्रमांकावर करावी तक्रार !

संबंधित शेतकऱ्यांनी वाढीव मोबदला मिळवून देतो, म्हणणाऱ्या लोकांविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ०२१७/२७३१००० या दूरध्वनी क्रमांकावर तक्रार करावी, प्रशासनाकडून संबंधितावर त्वरित कारवाई करण्यात येईल.