Type Here to Get Search Results !

रमजानुल मुबारक -२१ जे पेराल तेच उगवेल


रमजान महिन्याचा तिसरा आणि शेवटचा भाग काल सायंकाळपासून सुरु झाला आहे. याला जहन्नुमपासून मुक्तीचा काळ संबोधले जाते. रमजानचा हा शेवटचा भाग खूप महत्वाचा आहे. या दहा दिवसात दररोज रात्री अधिक काळ प्रार्थना करुन अल्लाहची मर्जी संपादन करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे. या महिन्याच्या शेवटच्या भागात लैलतुल कद्र ही एक अशी रात्र आहे कि, या रात्री केलेल्या प्रार्थनेचे पुण्य हे हजार महिन्यांच्या पुण्यासमान आहे, पण ती रात्र नेमकी कोणती हे अल्लाहने गुप्त ठेवले आहे. 

शेवटच्या खंडातील २१ ते २९ तारखा दरम्यान विषम संख्येतील ती एक रात्र आहे. पण यापैकी नेमकी रात्र कोणती हा प्रश्न आहे, म्हणून दहाच्या दहा रात्री जर आपण थोडी अधिक प्रार्थना केली तर बिघड़लं कुठं ? या रात्रीत एक रुपया दान केला तर हजार महिने रुपये दान केल्या समान आहे. दोन रकात नफील नमाज आदा केली तर हजार महिन्याची दोन रकात आदा केल्यासारखे आहे. म्हणजे एकदा एक कार्य केले तर हजार महिने केल्यासारखे पुण्य प्राप्त होत असल्याने दहा रात्री प्रार्थना करणारा निश्चितच अधिक पुण्य प्राप्तीस पात्र ठरतो.  

अल्लाहने आपल्याला दिलेले जीवन सत्कारणी लावण्यासाठी आपण सद्वर्तन, सद् विचार, सदाचाराने जगणे आवश्यक आहे. आपण जे इतरांना द्याल ते तशीच फेड करतील, म्हणून जीवनात प्रत्येक कार्य करतांना मनात हा विचार असावा. व्यापार, व्यवहार, वर्तन या सर्व बाबतीत काळजी घेणे आवश्यक आहे. व्यवहारात खोटेपणा, फसवणूक असे प्रकार करू नये, कारण ज्याला फसवले जाते, त्याची हाय किंवा तळतळाट ज्याला बददुआ म्हणतात ती चांगली नसते.

व्यवहारात सचोटी नसल्यास माणसे जीवनातून उठतात. दिलेले शब्द पाळणे व आपल्यावर केलेल्या उपकारांची जाणिव ठेवणे आवश्यक आहे. कृतज्ञता बाळगल्याने आत्मशांती प्राप्त होते तर कृतघ्नपणा केल्याने मनोशांती भंग पावते. जे पेराल ते उगवेल, या न्यायाने आपण केलेल्या कामाचा तसाच मोबदला आपणास मिळत असतो. यासाठी ईश्वराशी नाते जोडून सत्य आणि सचोटीची कास धरल्यास जीवन यशस्वी होते. 

एका राजाने आदल्या दिवशी घोषणा केली कि, उद्या सकाळी दरबारात येऊन कोणतीही व्यक्ति ज्या वस्तूला हात लावील, ती त्याची होईल. हे ऐकून प्रत्येक जण विचार करु लागला कि, मी सोने, चांदी, नाणे, महाल घेईल.

एक खूपच दरिद्री माणूस दरबारात आला व त्याने राजालाच हात लावला. आता राजाच त्याचा झाल्याने राजाची प्रत्येक वस्तू त्याची झाली. याप्रमाणे या सृष्टीचा जो राजा आहे तो ईश्वर/अल्लाह, त्याला आपले केले तर सर्व जग आपले होणार आहे, तेव्हा त्याला आपले करण्याचा जो काही मार्ग आहे, तो आपण अंगीकारल्यास सर्व काही आपले होईल, हे ध्यानात घ्यावे. (क्रमशः)

सलीमखान पठाण

9226408082