Type Here to Get Search Results !

रमजानुल मुबारक - ४ रमजान - मानवाला वरदान

 

तीन दिवसापासून पवित्र रमजान महिन्याला प्रारंभ झाला आणि प्रत्येक मुस्लीम घरातील दिनचर्या बदलून गेली. पहाटे उठून सहेरी करणे, फजरची नमाज, तिलावत ए कुरआन म्हणजे पोथी वाचन, अल्लाहचे नाम स्मरण, थोडा आराम, 1 दैनंदिन कामकाज, दुपारी जोहरची नमाज, पुन्हा कुरआन पठण, थोडा आराम, असरची नमाज, रोजा इफ्तारीची तयारी, इफ्तार, मगरीबची नमाज, चहापान, जेवण, ईशा आणि तरावीहची नमाज आणि नंतर निद्रा. अशा पद्धतीने दिनक्रम निश्चित झाल्याने इतर गोष्टी करण्यास कुणासही वेळ नसतो. 

रमजान पर्वात लग्न सोहळे किंवा इतर कोणतेही कार्यक्रम आयोजित केले जात नाहीत, कारण वेळच नसतो. संपूर्ण दिवस आणि रात्र अल्लाहने दाखवून दिलेल्या मार्गाने मार्गक्रमण करायचे असते. ज्या पद्धतीने एखादे प्रशिक्षण घेताना प्रशिक्षण काळात अनेक बाबी बाजूला ठेवून संपूर्ण लक्ष त्या प्रशिक्षणावर केंद्रित केले जाते. त्याच पद्धतीने रमजान महिन्यामध्ये दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींचा त्याग करून अल्लाहची प्रार्थना आणि त्याने सांगितले तेच कार्य केले जाते. यामुळे वातावरण भक्तीमय होऊन सद्गुणांची वृद्धी होण्यास मदत होते.

आपल्या वर्तनाने कुणाचे ही मन दुखावले जाणार नाही, याची काळजी घेण्याची शिकवण इस्लामने दिलेली आहे. म्हणूनच हजरत पैगंबरांवर दररोज कचरा टाकणारी महिला ज्यावेळी आजारी पडली, तेव्हा स्वतः पैगंबर तिला भेटायला गेले. त्यांचे ते वर्तन पाहून त्या महिलेला आपल्या कृत्याचा पश्चात्ताप झाला. तिने माफी मागितली. पैगंबरांनी सुद्धा मनात काहीही न ठेवता तिला माफ केले. चुका दुरुस्त करण्याची संधी दिली गेली पाहिजे, हा संदेश यातून दिला गेला. माणसं वाईट नसतात तर विचार आणि आचरण यातील तफावतीमुळे ती वाईट वागतात.

परवा चंद्रदर्शन झाल्यानंतर हिंदूधर्मीय बांधवांनी आपल्या अनेक मुस्लिम धर्मिय मित्रांना चांद मुबारक, रमजान मुबारक अशा शुभेच्छा दिल्या. आपल्या हिंदू बांधवांना देखील गुढीपाडवा व नवीन वर्षाच्या शुभेच्छा मुस्लिम बांधव देत असतात. सोशल मीडियावर दोन्ही दिवस एकमेकांना शुभेच्छा देणारे संदेश मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. अनेकता मे एकता हीच तर आमची भारतीय संस्कृतीची शान आहे आणि म्हणूनच माझा भारत देश महान आहे. हजारो वर्षाची आपली ही परंपरा जोपासण्याचे कार्य सर्वधर्मीय भारतीय नागरिक करीत असतात. एकमेकांच्या धर्माबद्दल असणारा हा जिव्हाळा आणि सलोखा भारताच्या भविष्यासाठी आवश्यक आहे.

राजकारणाची गरज म्हणून कोणी कसंही वागत असेल, परंतु सत्य काय आहे, हे सर्वश्रुत आहे. रमजान महिन्यातून सत्याचा स्वीकार आणि असत्याचा तिरस्कार हे सूत्र अंगी बाणवण्याचे कार्य घडत असते. (क्रमशः)

सलीमखान पठाण

   ९२२६४०८०८२