Type Here to Get Search Results !

या विद्यार्थ्यांच्या यशाने स्व. उमाकांत राठोड यांचं स्वप्न आज खऱ्या अर्थाने साकार : विजयकुमार राठोड


सोलापूर :  स्व. उमाकांत राठोड यांनी आपल्या आश्रम शाळेतील विद्यार्थी उच्चशिक्षित व्हावं, त्यांनी यश संपादन करावं, या निश्चयानं ही आश्रम शाळा सुरू केली होती. या चारही विद्यार्थ्यांच्या यशाने त्यांचं स्वप्न आज खऱ्या अर्थाने साकार होत आहे. अनेक माजी विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत शिक्षण पूर्ण केले, विविध क्षेत्रात उज्वल यश मिळवले, याचा संस्थेला अभिमान आहे, असं संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार राठोड यांनी म्हटले. 

दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगांव तांडा येथील किसनराव मागास समाज शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने संचलित आश्रम शाळेत शिकलेल्या रश्मी अशोक चव्हाण या विद्यार्थिनीने बी. ई. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिला सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई येथे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदावर नोकरी मिळाली. अजय सोमनाथ राठोड यानेही बी.ई. मेकॅनिकल शिक्षण पूर्ण करून कृषी विभागात नोकरी मिळाली. अभिषेक अशोक राठोड हा पोलीस विभागात भरती झाला तसेच संग्राम उल्हास पवार याला भूमी अभिलेख अधिकारी म्हणून नोकरी मिळाली आहे. या चार यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी विजयकुमार राठोड बोलत होते.

या यशवंत विद्यार्थ्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन यशाला गवसणी घालताना, स्वर्गीय उमाकांत राठोड यांचं स्वप्न खऱ्या अर्थाने साकार केलंय असंही विजयकुमार राठोड यांनी यावेळी सांगितले. 

मुळेगाव तांडा येथील स्वर्गीय उमाकांत राठोड यांनी स्थापन केलेल्या आश्रम शाळेत शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात उज्वल संपादन केलेल्या चार माजी विद्यार्थ्यांचा अध्यक्ष विजयकुमार राठोड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शाल-श्रीफल, पुष्पगुच्छ असं सत्काराचे स्वरूप होतं. 

यावेळी केसर प्रशालेचे मुख्याध्यापक शिवकुमार देवरे, चिंतामणी माध्यमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक रमेश राठोड, शक्ती प्राथमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक सचिन राठोड, यांच्यासह सर्व शिक्षक व विद्यार्थी वर्ग तसेच मुळेगाव येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोज राठोड यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. बी. चव्हाण सर यांनी केले तर सुरवसे सर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.