Type Here to Get Search Results !

रमजानुल मुबारक -१९ मानवता हाच धर्म

 

रमजानुल मुबारक - १८

जुमआ (शुक्रवार) -दिवसांचा सरदार

चालू वर्षाच्या रमजान महिन्यातील आजचा तिसरा जुमआ अर्थात शुक्रवार. ज्याप्रमाणे श्रावण महिन्यात सोमवारला महत्व आहे, तसेच महत्व रमजान महिन्यात शुक्रवारला आहे. ईश्वराने पृथ्वीचा पाया शुक्रवारी रचला. इस्लामी इतिहासानुसार जगाच्या इतिहासातील अनेक महत्वपूर्ण घटना या शुक्रवारीच घडल्या आहेत. पृथ्वीवरील पहिला मानव असणारे हजरत आदम अलैसलाम (जे समस्त मानवजातीचे पिताश्री आहेत) हे शुक्रवारीच स्वर्गातून पृथ्वीतलावर पाठवले गेले.याच दिवशी अल्लाहने त्यांची माफी स्विकारली.

शुक्रवारीच हजरत नुह अलैसलाम यांची नौका प्रचंड प्रलयानंतर किनारी लागली. शुक्रवारीच हजरत इब्राहीम अलै सलाम नमरुदच्या आगीतून सुखरुप बचावले. हजरत मुसा अलैसलाम फिरऔनच्या जाचातून मुक्त झाले. हजरत युनूस अलै सलाम माशाच्या पोटातून सुखरूप बाहेर आले. अशा खूप घटना सांगता येतील.

शुक्रवारला ईद-ऊल-मोमीनीन ही म्हटले जाते.

आजच्या दिवशी विशेष साप्ताहिक प्रार्थना नमाज ए जुमआ ही आदा केली जाते. दुपारी नमाजची अजान झाल्याबरोबर सर्व व्यवहार बंद करुन नमाजला जावे, अशी हजरत पैगंबरांची शिकवण आहे.शुक्रवारी एक क्षण (पल) असा आहे कि, या क्षणाला जे काही मागाल, दुआ कराल ती स्विकार केली जाते. पण तो क्षण नेमका कोणता, हे अल्लाहने गुप्त ठेवलेले आहे.मात्र तो क्षण दुपारच्या वेळेत आहे, असे म्हणतात. 

रमजान महिन्यातील शेवटचा शुक्रवार हा जमातुल विदाअ अर्थात निरोपाचा शुक्रवार म्हणूनही पाळला जातो. रमजान महिन्यात मिळणारे ७० पट पुण्य हे प्रत्येकासाठी एक पर्वणी आहे. या संधीचा सदुपयोग करून घेण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करणे, आवश्यक आहे. रमजान महिना सुरू झाला आणि आता तो पूर्णत्वाकडे मार्गक्रमण करीत आहे. १८ दिवस कसे निघून गेले, हे समजले देखील नाही. त्यामुळे उर्वरित दिवसांचा जास्तीत जास्त पुण्य संचय करून घेण्यासाठी प्रयत्न करावा.(क्रमशः)

""""""""""""""""""""""""

रमजानुल मुबारक -१९  

मानवता हाच धर्म

रमजान महिन्याचा कालावधी जसजसा संपत आहे, तशी ईदची तयारी सुरू झाली आहे. बाजारपेठेत कपडे व इतर साहित्य खरेदी सुरु झाली आहे. जकात अदा करुन गरजूंना मदत करण्याची लगबग वाढली आहे. जवळचे गरजू नातेवाईकांना मदत पोहोच झाली असून देशभरातील मदरसांच्या सफिरांनी आपली वसूली केली आहे व काही करत आहेत. एकमेकांना साह्य करण्यासाठी हात पुढे सरसावले आहेत. मानवतेच्या भावनेतून मदतीचा ओघ कोणत्याही सरकारी मदतीशिवाय सुरु आहे. 

हजरत पैगंबरानी सांगितलेला मार्ग व कुरआन मधील मार्गदर्शनानुसार वर्तन करण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करीत असून रमजान महिन्याच्या पुण्यपर्वाचा लाभ घेण्याचा प्रयत्न प्रत्येक जण आपल्या परीने करीत आहे. 

काल वाट्सअप ग्रुपमधील एक पोस्ट पाहिली अन मन विषण्ण झाले. या पोस्टमध्ये एक व्यक्ति पंतप्रधान व त्यांच्या पक्षाला शिवीशाप देत असल्याचे दाखविले आहे. हे पाहून एक विचार मनात आला कि, आपल्या देशात सर्व जातिधर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात.

भाजी विकणारा, दुधवाला,किराणावाला, डॉक्टर, ड्रायव्हर व इतर अनेक क्षेत्रात सर्व जातिधर्माची माणसे एकत्र वागतात, व्यवहार करतात पण त्यांच्यात कधी जात आडवी येत नाही. भाजी विकणाऱ्याला त्याची जात कुणी विचारीत नाही कि, किराणावाला कोण आहे, हे कुणी पाहत नाही. कय्युमच्या दुकानात मटन चांगले मिळते, म्हणून शहरातील सर्व समाजाचे लोक तेथे गर्दी करतात तर सिकंदरच्या दुकानातून शहरातील सर्व व्यापारी तेल खरेदी करतात. गुजराणीच्या दुकानातून शेकडो मुस्लीम किराणा खरेदी करतात. 

दैनंदिन जीवनात जाती धर्माचा विचार कुणीही करीत नाही, पण गेल्या दशकभरात देशात नवे सत्ताधारी आल्यापासून समाज विघटनाची प्रक्रिया सुरु झाल्यासारखे दिसत आहे. तेच गाव, तोच समाज, तेच लोक असतांना आता तेढ वाढतेय. नागरिकांचे मूलभूत प्रश्न व समस्या सोडविण्याऐवजी नको ते प्रश्न निर्माण करुन लक्ष विचलीत केले जात आहे. 'हे विश्वचि माझे घर' ही ज्ञानेश्वरांनी मांडलेली संकल्पना मोडीस काढून वेगळया पध्दतीने केवळ मुस्लीम विरोध निर्माण करण्याचा प्रयत्न काही शक्ति करीत आहेत. याला मिडिया खतपाणी घालत आहे. 

विरोधी पक्ष दीन आणि हीन झाला आहे. पण या परिस्थितीतही काही समजूतदार माणसंही या बेफाम सुटलेल्या वारु ला आवरण्याचा प्रयत्न करीत आहेत. खरं तर इस्लाम धर्माने कुणाचा द्वेष करण्याची शिकवण दिलेली नाही. अजाणला आक्षेप घेणारे खूप निर्माण झाले पण आरतीला कुणी मुस्लीमाने कुठं आक्षेप घेतल्याचे ऐकिवात नाही. मी राहतो त्या भागात जेवढ्या मशिदी आहेत, तेवढीच मंदिरे आहेत. 

नवरात्र व गणेशोत्सवात या ठिकाणी खूप उत्साहात आरत्या व पूजा पाठ होते, पण कुणी कधी आक्षेप घेतलेला नाही. सर्व जण गुण्यागोविंदाने राहतात. हे वातावरण प्रत्येक ठिकाणी हवे. यालाच मानवता धर्म म्हणतात. माझा हिंदू धर्मिय मित्रपरिवार खूप मोठा आहे. त्यांच्यामध्ये वावरताना मला नेहमी आदराचे स्थान मिळते. आम्ही कधीही एकमेकांचा द्वेष करीत नाही, असं प्रत्येकाच्या बाबतीत आहे. खूप मित्र चांगले आहेत. परंतु दोन्हीकडच्या मुठभर लोकांमुळे वातावरण बिघडते. 

त्यात आता राजाश्रय मिळत असल्याने नको ते प्रश्न निर्माण केले जात आहेत, प्रत्येक माणसाच्या जीवनाशी निगडित मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून राजकीय सारीपाटावर वेगळ्या पद्धतीने यश मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जातोय. परंतु मला खात्री आहे, आपली लोकशाही अतिशय प्रगल्भ आहे. आपली जनता सुज्ञ आहे आणि देशाचे हित लक्षात घेऊन आगामी काळात देखील चांगले निर्णय होतील. मानवता हीच सर्वश्रेष्ठ आहे. या दृष्टीने जे काही घडेल ते चांगलेच घडेल अशी आशा आहे. (क्रमशः)

सलीमखान पठाण

  9226408082