Type Here to Get Search Results !

कर्तव्य बजावत असताना महिलांनी स्त्री-पुरुष समानता जोपासली पाहिजे : पोलीस आयुक्त एम. राजकुमार

 



उत्कृष्ठ कामगिरी केलेल्या महिला पोलीस अधिकारी- कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव

सोलापूर : जागतिक महिला दिवस साजरा करताना, स्त्री-पुरुष समानता महत्वाची आहे. ही भावना प्रत्येकाच्या मनात असणं अगत्याचं आहे. त्याचवेळी त्यांनी स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे. सार्वजनिक जीवनाबरोबर आपल्या खाजगी आयुष्यातही कर्तव्य बजावत असताना सर्व महिलांनी स्त्री-पुरुष समानता जोपासली पाहिजे. असं आवाहन पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी केले.

महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढयाच्या स्मरणार्थ दरवर्षी, ०८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. याचे औचित्य साधून सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाचे वतीने मंगळवारी, १२ मार्च रोजी पोलीस कल्याण केंद्र येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.

यावेळी पोलीस उप-आयुक्त (मुख्यालय) अजित बोऱ्हाडे, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशा) श्रीमती डॉ. दिपाली काळे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीमती प्रांजली सोनवणे असे हजर होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती वासंती येळेगांवकर (आर्थिक सल्लागार) व श्रीमती सोनल पांचाळ यांची उपस्थिती होती. पोलीस आयुक्त एम. राजकुमार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. 

सदर कार्यक्रमांत अंशकालीन महिला कर्मचारी यांना साडी वाटप करण्यात आले. पोलीस आयुक्तालयातील उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या महिला पोलीस अधिकारी व अंमलदार यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. 


त्यात दामिनी पथक, महिला सुरक्षा विशेष कक्ष, अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष, एमआयडीसी, फौजदार चावडी व विजापूर नाका पोलीस स्टेशनकडील मुस्कान पथक, सायबर पोलीस ठाणे, पोलीस मुख्यालय हॉस्पिटलकडील महिला स्टाफ त्याचप्रमाणे सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे), वपोनि अश्विनी भोसले, सहा. पोलीस निरीक्षक रईसा शेख, पोलीस उप निरीक्षक संजीवनी व्हट्टे यांना सन्मानित करण्यात आलं.

या कार्यक्रमाची प्रस्तावना पोलीस उप आयुक्त (गुन्हे/विशा) डॉ. दिपाली काळे यांनी केली. त्यात त्यांनी जागतिक महिला दिन ०८ मार्च रोजी साजरा करण्यात येतो. पोलीस आयुक्तालयातील महिला अधिकारी व अंमलदार या विविध ठिकाणी महिला दिनाच्या कार्यक्रमाकरीता उपस्थित राहिले आहेत. पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी महिला पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यासाठी महिला दिनाचे आयोजन करावं, असं प्रस्तावित केलं होतं. यातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याचे सांगितले.

महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आहेत. ही महिलांसाठी अभिमानची बाब आहे. तरी सर्व महिलांनी प्रेरित होऊन काम करावं, असे आवाहन केले. तसेच उपस्थित महिला अंमलदार यांना जबाबदारीने काम करावं, असं आवाहन केले.

पोलीस दलात कर्तव्य बजावत असताना महिला कर्मचाऱ्यांनी पोलीस गणवेषाची प्रतिष्ठा राखण्याबरोबरच दुचाकी वाहन चालवत असताना, आपल्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून कटाक्षाने हेल्मेटचा वापर केला पाहिजे, असं आवाहन पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी यावेळी केले. 

यावेळी प्रमुख पाहुणे श्रीमती येळेगांवकर यांनी महिलांनी आर्थिक गुंतवणूक कशी करावी या विषयावर तर श्रीमती सोनल पांचाळ यांनी त्वचेची काळजी कशी घ्यावी, या विषयावर मार्गदर्शन केले. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीमती प्रांजली सोनवणे यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.