सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यात केवळ अठरा टक्के सिंचन क्षेत्र आहे त्यामुळे तालुक्यातील शेतकरी आर्थिक दृष्ट्या समृद्ध झाला नाही. तालुक्याचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविणे गरजेचे आहे.याकरिता आपण तालुक्यातील सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी सीना-भीमा नदीवर नवीन कोल्हापूर पध्दतीचे बंधारे, सीना-भीमा जोडकालवा निर्माण करण्यावर भर देत आहोत. भविष्यात तालुक्यातील शेतीला आणि पिण्यासाठी पाणी कमी पडू नये यासाठी आपण अनेक योजना राबवित असून येणाऱ्या काही वर्षात तालुका सुजलाम सुफलाम करू अशी ग्वाही आमदार सुभाष देशमुख यांनी दिली.
राजूर येथे आमदार देशमुख यांच्या विशेष प्रयत्नातून ९ कोटी खर्चातून सीना नदीवर बांधण्यात येणाऱ्या नवीन पूलाच्या बांधकामाचे तसेच इतर दीड कोटीच्या विकासकामांचे भूमिपूजन देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.
यावेळी मंचावर सोलापूर बाजार समितीचे संचालक बाळासाहेब शेळके, माजी सभापती डाॅ. चनगोंडा हविनाळे, तालुकाध्यक्ष संगप्पा केरके, महिला तालुकाध्यक्ष अंबिका पाटील, हनुमंत कुलकर्णी, मळसिध्द मुगळे, यतीन शहा, संदीप टेळे, सरपंच लक्ष्मण गडदे, राधाकृष्ण पाटील, उमेश मळेवाडी, प्रा. विजयकुमार बिराजदार, उपसरपंच सतीश देवकते, धर्मराज बळ्ळारी, हनुमंतराव बिराजदार, कृष्णप्पा बिराजदार, सिध्दाराम ढंगापुरे, अभिमन्यू पाटील, शिवानंद बिराजदार, भीमाशंकर पाटील आदी उपस्थित होते.
आमदार देशमुख म्हणाले, मागणी नसतानाही आपण भीमा-सीना नदी एकमेकांना जोडून दोन्ही नद्या बारमाही करण्यासाठी जोडकालवा प्रकल्प हाती घेतला आहे. वडापूर, वडकबाळ येथे बॅरेजस आपण बांधणार आहोत, तसेच इतर ठिकाणी बंधारे कशी बांधता येतील यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वरील सर्व प्रकल्प पूर्ण झाल्यास तालुक्यातील सिंचन क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढेल. त्यामुळे तालुक्यात हरितक्रांती होईल. राजूर गावाला आपण साडे दहा कोटी रूपयाचा निधी दिला आहे. यापुढे देणार आहोत. राजूरच्या जनतेने माजी मंत्री स्वर्गीय आनंदराव देवकते यांच्यावर मोठे प्रेम केले तसेच प्रेम जनतेने आपल्यावर करावे असे आवाहन करून देशमुख यांनी आजवर तालुक्याचा विकास साधला असून आणखीन विकासकामे करून तालुका विकासाचे मॉडेल करू अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी शेळके म्हणाले, आमदार देशमुख तालुक्याचा विकास साधत आहेत, चांगल्या कामाला सर्वांनीच पक्ष न पाहता सहकार्य करावे, आपले चांगल्या कामाला नेहमीच सहकार्य राहील, माजी मंत्री आनंदराव देवकते यांनी तालुक्यात विकासाचे राजकारण केले तसेच काम देशमुख तालुक्यात करीत आहेत. सूत्रसंचालन लक्ष्मीकांत बिराजदार यांनी करून आभार मानले.