Type Here to Get Search Results !

स्वतःचा संसार वाचविण्यासाठी बलात्काराची फिर्याद दाखल; आरोपीची निर्दोष मुक्तता


सोलापूर : घरात घुसून चाकूचा धाकाने विवाहितेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दाखल झालेल्या खटल्यात बार्शी सत्र न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केलीय. स्वतःचा संसार वाचविण्यासाठी प्रेमसंबंध झाकण्याकरिता आरोपीला या खटल्यात खोटेपणाने गुंतविण्यात आल्याचे खटल्याच्या सुनावणीत आढळून आले. आरोपीच्या वकिलाचा युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली. 

या खटल्याची पार्श्वभूमी अशी की, माढा तालुक्यातील एका गावात पीडित विवाहिता घरात एकटीच असताना संरक्षण भिंतीवरून उडी मारून आरोपी घरात घुसला आणि चाकूचा धाक दाखवून त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची फिर्याद स्वतः पीडित विवाहितेने माढा पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या गुन्ह्यात आरोपी अनेक दिवस कारागृहात होता. दरम्यान, त्याची जामिनावर सुटका झाली. 

या खटल्याची सुनावणी बार्शी सत्र न्यायालयात झाली. आरोपीचे वकील ॲड. धनंजय माने यांनी घेतलेल्या उलट तपासणीत पीडित विवाहितेने दिलेली कबुली धक्कादायक ठरली. तिने दिलेल्या कबुलीनुसार तिचे आणि आरोपीचे प्रेमसंबंध होते. दोघांचा मोबाईलवरून प्रेमालाप होत होता. प्रेमाच्या आणाभाका घेत दोघांनी एकत्र मोबाईलवर सेल्फी फोटो काढले होते. परंतु पत्नीचे हे प्रेमप्रकरण नवऱ्याला समजल्यानंतर त्याने पत्नीला जाब विचारला. तिच्या आई आणि भावाला बोलावून घेऊन तिला माहेरी हाकलून दिले. 

दरम्यान, तिच्या माहेर-सासरच्या मंडळींची आठ दिवसांनी बैठक झाली. नवऱ्याने अट घातली की, तिने जर त्या तरूणाविरूध्द बलात्काराची फिर्याद दिली तरच तो तिला घरात नांदविण्यासाठी स्वीकारू शकेल. त्यामुळे स्वतः चा संसार टिकविण्यासाठी तिने आरोपीविरूध्द खोटी फिर्याद दिली.

याप्रकरणी आरोपीतर्फे ज्येष्ठ फौजदारी वकील धनंजय माने यांच्यासह ॲड. जयदीप माने, ॲड. शरद झालटे, ॲड. सुदर्शन शेळके, ॲड. सिध्देश्वर खंडागळे यांनी काम पाहिले.

... चौकट ...

... नुकसान भरपाईची असली पाहिजे 

कायदेशीर तरतूद : ॲड. धनंजय माने

बलात्काराचा गुन्हा निंदनीय आहे. परंतु बलात्काराचे खोटे आरोपसुध्दा केले जातात, हे या खटल्यात दिसून आले आहे. फौजदारी दंड संहितेमध्ये खोट्या खटल्यामध्ये आरोपीला गुंतविले असेल तर नुकसान भरपाई देण्याची तरतूद नाही. वास्तविक पाहता अशा खोट्या खटल्यांमध्ये  गुंतविण्यात आलेल्या आरोपींनी भोगलेल्या कारावास अन्‌ मनःस्तापाबद्दल नुकसान भरपाई देण्याची कायदेशीर तरतूद असली पाहिजे, असे मत आरोपीचे वकील ॲड. धनंजय माने यांनी व्यक्त केले आहे.