रमजान - ३
सर्व काही अल्लाहच्या मर्जीनेच घडते !
या जगाचा स्वामी ज्याला आपण ईश्वर, परमेश्वर किंवा अल्लाह म्हणतो. तो या जगाचा दाता आहे, त्याच्या मर्जीनुसार जगाचा कारभार होत असतो. सर्व भावना तोच निर्माण करतो. दैनंदिन जीवन जगत असतांना प्रत्येकाला विविध प्रश्नांना सामोरे जावे लागते. प्रत्येक व्यक्तिच्या काही ना काही इच्छा, आकांक्षा, अपेक्षा, ध्येय, उद्दिष्टे असतात. त्यांच्या प्राप्तीसाठी तो सर्व प्रकारच्या मार्गाचा अवलंब करीत असतो.
पद, प्रतिष्ठा, सत्ता, संपत्ती, पैसा, मान-सम्मान या बाबींसाठी सर्व काही करण्याची त्याची तयारी असते. इस्लाम धर्मात मात्र यापैकी एकाही गोष्टीला थारा नाही. कारण या सर्व गोष्टी अल्लाहकडून मिळणाऱ्या असतात. तुमच्या नशिबात असतील तर मिळतील, अन्यथा तुम्ही किती ही प्रयत्न केले तरी व्यर्थ. कुरआन शरीफ मध्ये अल्लाहने म्हटल्याप्रमाणे या दुनियेत आपण सर्व मुसाफिर आहोत. या दुनियेनंतरची अजून एक दुनिया आहे, जेथे आपण कायम वास्तव्य करणार आहोत.
येथे जगतांना केलेल्या प्रत्येक कृत्याचा हिशोब आपणास तेथे द्यावा लागणार आहे. त्यानुसारच स्वर्ग कि नरक म्हणजे जन्नत कि दोजख किंवा जहन्नुम याचा निर्णय होईल. आपल्या मनातील स्वैर इच्छांना लगाम घालण्याचे काम रोजा करतो, तर रमजान मधील रात्रीच्या जादा नमाजरुपी प्रार्थनेतून ईश्वराची आराधना करण्याचे कार्य केले जाते.
रोजा मध्ये तीव्र इच्छा असून ही आपल्या मूलभूत गरजा असलेल्या भूक व तहान यावर आपण स्वतःच नियंत्रण ठेवतो. जो स्वतःवर नियंत्रण ठेवतो, तो इतर गोष्टींवर ही जय मिळवू शकतो.
अल्लाहची श्रध्दा व भिती हे कार्य करण्यास सहायभूत ठरते. रात्रीची जादा प्रार्थना नमाजे तरावीहच्या रूपाने अल्लाहच्या आदेशांचे स्मरण करून आपल्यात एकाग्रता निर्माण करते. मनमानी जीवन न जगता रब चाही जीवन जगण्याची प्रेरणा या प्रार्थनेतून मिळते व जन्नत (स्वर्ग) प्राप्ती जे आपले ध्येय आहे, याकडे वाटचालीचा मार्ग सुकर करण्याचे कार्य रमजान महिन्यात घडते.
मुळात या दुनियेत जगतांना आपण कसे जगावे, याची आदर्श आचारसंहिता अल्लाहने कुरआन शरीफच्या माध्यमातून आपल्याला दिली आहे. त्यातील मार्गदर्शनानुसार आपण वागल्यास आपले जीवन सफल होणार आहे. कुरआन मध्ये जीवनाच्या सर्वच प्रश्नांची उत्तरे सामावलेली आहे.
उदाहरणार्थ, मातापिता (वालदैन) यांचे संदर्भात कुरआन मध्ये अल्लाहने म्हटले आहे कि, जेव्हा तुमचे माता-पिता वृध्द(बुढे) झाल्यास त्यांना झिडकारू नका, त्यांच्याशी उंच आवाजात बोलू नका, त्यांना त्रास होईल, असे वागू नका. तुमच्या बालपणी त्यiनी खूप कष्ट घेऊन तुमचे संगोपन, पालनपोषण केले आहे, तेव्हा त्यांचा योग्य सन्मान राखणे, त्यांच्याकडे लक्ष देणे, ही आता तुमची जबाबदारी आहे. कुरआन मधील ही शिकवण प्रत्येकाने अंगिकारल्यास जगात वृध्द आश्रम दिसणारच नाहीत. (क्रमशः)
सलीमखान पठाण,
9226408082