सोलापूर : शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांची व्यक्तीगत सुरक्षा धोक्यात आणण्याचे उद्देशाने बंगल्यातून अंडी व पाण्याच्या बाटल्या फेकण्यात आल्या. ही घटना सोनामाता आदर्श बालक मंदिर येथे मंगळवारी, १२ मार्च रोजी सकाळी ०७.१५ वा. च्या सुमारास घडलीय. याप्रकरणी दाखल फिर्यादीनुसार सदर बझार पोलिसांनी चिराग दावडा यांच्यासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे शहर पोलिसांनी सांगितले.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, सोनामाता आदर्श बालक मंदिरात सकाळी शाळेतील विद्यार्थ्यांची प्रार्थना सुरू असताना, शिक्षक विद्यार्थ्यांना सूचना देण्यासाठी माइकचा वापर करीत होते. शाळेच्या लगत राहत असलेले चिराग दावडा आणि श्रीमती दावडा (रा. १५८, रेल्वे लाईन, सोलापूर) यांनी, विद्यार्थी व शिक्षकांची जीवित सुरक्षा धोक्यात आणण्याच्या उद्देशाने त्यांच्या राहत्या बंगल्यातून प्रार्थना करीत असलेल्या विद्यार्थी व शिक्षकांकडे अंडी आणि पाण्याच्या बाटल्या फेकून मारल्या.
याप्रकरणी राजश्री प्रभुलिंग राजमाने (रा. १५१/६, लक्ष्मी नगर, देगाव रोड, सोलापूर) यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार सदर बझार पोलिसांनी चिराग दावडा याच्यासह दोघाविरुद्ध भादवि ३३६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोहेकॉ/ १४०५ गायकवाड या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.