इस्लामी तत्वानुसार प्रत्येक ऐपतदार मुस्लीम व्यक्तिने जकात आदा केली पाहिजे,न देणारे गुन्हेगार आहेत. यासाठी आपल्या दैनंदिन व्यवहाराचा चोख हिशोब ठेवला पाहिजे. हजरत पैगंबरांनी ही म्हटले आहे कि, कुणाशी देणे-घेणे व्यवहार करतांना नेहमी लिहून ठेवीत जा, म्हणजे हिशोबात गोंधळ होत नाही.
आपल्या देशात कर प्रणाली एवढी किचकट आहे कि, इन्कम टॅक्स किंवा सेल टॅक्स अदा करतांना खोटे रेकार्ड करुन कर चुकवेगिरीकडे बहुतेकांचा कल असतो. जीएसटीने तर व्यापारी व सर्वसामान्यांना जेरीस आणले आहे. इस्लामी जकातीमध्ये चोरी अथवा चुकवेगिरी करुन चालत नाही, तर दिलेली जकात म्हणजे, आपल्या मालाचा मळ असून जकात दिल्याने माल स्वच्छ होतो.
व्यापार, व्यवहार, शेती व सर्व प्रकारच्या उदिम व्यापारातील नफ्यावर जकात अदा करणे आवश्यक आहे. एक वर्ष झाल्यावर जकात दिली पाहिजे. जकातीच्या अनेक बाबी आहेत, ज्यावर जकात लागू आहे. दैनंदिन वापरातील गाड्या, राहते घर आदि वर जकात नाही, मात्र मालवाहू किंवा प्रवासी वाहने, भाडोत्री दिलेली घरे, शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर जकात दिली पाहिजे. शेकडा अडीच टक्के म्हणजे हजार रुपयाला पंचवीस रुपये एवढे जकातीचे प्रमाण आहे.
जकात देतांना रोख स्वरूपात किंवा कपडे, धान्य, किराणा माल आदि स्वरूपातही दिली जाते. समाजातील गरिब व गरजू लोकांच्या गरजा पूर्ण होऊन त्यांनाही इतरांप्रमाणे जीवन जगता यावे, हा जकातीचा मूळ उद्देश आहे. मोठ्या शहरातून श्रीमंत लोक गरीब लोकवस्तीत जकातीच्या रकमेतून मदत वाटप करतात.
जकात देतांना जवळच्या गरजू नातेवाईकांना प्रथम दिली पाहिजे, मात्र आई, वडील, मामा हे जकातीची मदत घेण्यास पात्र नाहीत. इतर नातेवाईकांना ती देता येते. एखाद्याच्या गरजा पूर्ण होतील, एवढी मदत त्याला केली पाहिजे. १०० लोकांना देण्यापेक्षा १० लोकांना देऊन ते स्वयंपूर्ण होतील व पुढच्या वेळी त्यांना जकात घेण्याची वेळ येणार नाही, अशा पध्दतीने नियोजन करुन समाजाच्या गरजा कशा पूर्ण होतील याकडे लक्ष दिले गेले पाहिजे.
सामाजिक व आर्थिक विषमता दूर करण्यामध्ये जकातीचा मोठा वाटा आहे. कधी कधी व्यापार किंवा धंद्यामध्ये तोटा झाल्यास कुटुंब उघड्यावर पडते. दिर्घ आजारपणामुळे ही कुटुंबाची वाताहात होते. गरीबीमुळे जीवन जगणे अशक्य होते, अशा उद्भवणाऱ्या कठीण परिस्थितीमध्ये गरजूंना मदतीचा हात देण्यासाठी जकातीच्या रकमेचे मोलाचे योगदान असते.
ज्यांच्या मागे कुणी नाही, अशा कुटुंबांना यातून मदतीचा हात दिला जातो. अनेक सामाजिक संघटना समाजातील अशा गरजू घटकांना वर्षभर मदत करीत असतात. या कामासाठी लागणारा निधी रमजान महिन्यात जकातीच्या रकमेतून एकत्रित केला जातो व गरजूंना त्याचे वितरण केले जाते. (क्रमशः)
सलीमखान पठाण
9226408082