सोलापूर : घरातील खोलीमध्ये चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता जनावरांच्या सुरक्षिततेची कसलीही काळजी न घेता, त्यांना त्रास होईल, त्यांना हालचाल करता येणार नाही, अशा अवस्थेत बांधून ठेवल्याचे निदर्शनास आले. हा प्रकार मंगळवारी मध्यरात्री शास्त्री नगरातील अन्सारी चौकात घडलाय. याप्रकरणी सरकार पक्षाच्या वतीने पोलीस कॉन्स्टेबल काळजे यांच्या फिर्यादीनुसार सदर बझार पोलीस ठाण्यात सादिक कुरेशीसह दोघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.
याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, शास्त्रीनगर अन्सारी चौकातील रहिवासी सादिक गुड्डू कुरेशी याने त्याच्या परिचयाच्या मन्ना सिरन कुरेशी (रा. अन्सारी चौक, शास्त्री नगर, सोलापूर) याच्या खोलीत पांढऱ्या रंगाचे खिलारी जातीचे ०३ गायी त्यांच्या चारा-पाण्याची कोणतीही सोय न करता दाटीवाटीने बांधून ठेवल्या होत्या.
त्या गायी कत्तल करण्याच्या उद्देशाने बांधून ठेवल्या होत्या, अशा संशयाची फिर्याद पोकॉ/ १५५५ विठ्ठल चिदानंद काळजे (नेमणूक : सदर बझार पोलीस ठाणे) यांनी मंगळवारी मध्यरात्रीनंतर सदर बझार पोलिस ठाण्यात दाखल केली. त्यानुसार सादीक गुडु कुरेशी, मन्ना सिरन कुरेशी यांच्याविरुद्ध महाराष्ट्र किपींग अॅण्ड मुव्हमेंट ऑफ कॅटल इन अर्बन एरीयाज अधिनियम १९७६ चे कलम ३ व १३, तसेच प्रीव्हेंशन ऑफ क्रुएलेटी टु अॅनिमल अॅक्टचे कलम ९ व महाराष्ट्र पशुसंवर्धन कायदा १९७६ चे कलम ५,९,११, प्राण्यास क्रुरतेने वागविण्यास प्रतिबंध कायदा १९६० चे कलम ११ (१), (F), (H), (I) (K) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. या तिन्ही गाईंची किंमत ६० हजार रूपये असल्याचे सांगण्यात आले. पोलीस हवालदार इनामदार या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.