सोलापूर : तुझं चारित्र्य खराब आहे, तुझ्यापेक्षा लाख पटीने चांगल्या पोरी आमच्या पोराला मिळाल्या असत्या, अशा रितीने चारित्र्यावर शिंतोडे उडवत जिव्हारी लागणाऱ्या शब्दात एका विवाहितेचा सासरी छळ झालाय. ही ह्रदय हे लावून टाकणारी घटना बागलकोट जिल्ह्यातील जमखंडी येथे घडलीय. सासरच्या मंडळींनी ५० लाखाची मागणी करून केलेल्या शारीरिक व मानसिक छळास कंटाळून सौ. सृष्टी बसवराज मुगती (वय २४ वर्षे) हिने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार फौजदार चावडी पोलीस ठाण्यात चौघाजणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, हल्ली दमाणी नगर, लक्ष्मी पेठ येथे वास्तव्यास असलेली सौ. सृष्टी या सासरी नांदत असताना, तुला तुझा नवरा पसंत करत नाही, तुझे शिक्षण बघून लग्न केलेले आहे, तुला तुझा नवरा व्यवस्थित नांदविणार नाही, आम्हाला मेडीकलच्या व्यवसायाकरीता तू, तुझ्या आई वडीलांकडून ५० लाख रुपये घेऊन ये, असा तगादा शारीरिक व मानसिक छळ करीत होते.
त्यांची मागणी पूर्ण होत नसल्याने सौ. सृष्टीचा जाचहाट, छळ करुन वेळोवेळी मारहाण करण्यात आली. ती सासरी गेल्यापासून शिवीगाळ, दमदाटी तिच्यासाठी नित्याचीच बाब होती. सुमारे दीड वर्ष सहन केल्यावर या छळास कंटाळून सौ. सृष्टीने माहेर जवळ केले. फौजदार चावडी पोलिसांनी तिच्या फिर्यादीनुसार बसवराज मुगती (पती), विजयालक्ष्मी मुगती(सासू, दोघे रा. मुगती गल्ली, मंगळवार पेठ, बनहट्टी, जमखंडी), श्वेता बेळवगी (नणंद), दोडबसप्पा शंकरप्पा बेळवगी (रा. किम्स हॉस्पीटलजवळ, हुबळी) या चौघांविरुद्ध भादवि ४९८ (अ), ३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस हवालदार कटारे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.