सोलापूर : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक 7 मे 2024 रोजी मतदानाची प्रक्रिया होणार आहे. यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी आपल्या अधिनस्त असलेल्या मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रशिक्षण लक्षपूर्वक घ्यावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक प्रशिक्षण व्यवस्थापनचे नोडल अधिकारी संतोष देशमुख यांनी केले.
नियोजन भवन येथे आयोजित सर्व क्षेत्रीय अधिकारी (झोनल ऑफिसर) यांच्या निवडणूक प्रशिक्षण कार्यशाळेत उपजिल्हाधिकारी देशमुख मार्गदर्शन करत होते. या प्रशिक्षणास नियुक्त सर्व क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.
उपजिल्हाधिकारी देशमुख पुढे म्हणाले की, प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये, तसेच सर्व क्षेत्रीय अधिकारी यांच्या कामात एकसूत्रीपणा राहावा यासाठी हे जिल्हास्तरीय प्रशिक्षण आवश्यक असून सर्व अधिकाऱ्यांनी हे प्रशिक्षण लक्षपूर्वक घ्यावे. तसेच या प्रशिक्षणातून मतदान केंद्रावरील सर्व निवडणूक प्रक्रियेची माहिती समजून घेऊन त्याचा सूक्ष्मपणे अभ्यास करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
त्याप्रमाणेच कायदे प्रक्रिया व मा.भारत निवडणूक आयोगाकडील नवनवीन सूचना याची पूर्ण माहिती, मतदान केंद्राध्यक्षाची भूमिका, ईव्हीएम तसेच व्हीव्हीपॅट आदी यंत्रणाबाबत सविस्तर माहिती प्रत्येक क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी समजून घेणे आवश्यक आहे. तसेच पोस्टल मतदानासाठी करावी लागणारी प्रक्रिया, निवडणुकीचे महत्व समजून प्रत्येकाने दिलेली जबाबदारी अत्यंत चोखपणे पार पाडण्यासाठी प्रशिक्षणात दिलेल्या महत्त्वपूर्ण सूचनांचे तंतोतंत पालन करावे तसेच निवडणूक आयोगाकडून उपलब्ध करून देण्यात आलेले साहित्याचे वाचन करून प्रत्येक बाबीची सूक्ष्म माहिती घ्यावी, अशा सूचना देशमुख यांनी दिल्या.
यावेळी देशमुख यांनी उपस्थित सर्व क्षेत्रिय अधिकाऱ्यांना मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया अत्यंत सुरळीतपणे पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे आवश्यक असलेल्या सर्व बाबींची अत्यंत सविस्तर व प्रात्यक्षिके दाखवून प्रशिक्षण दिले.