Type Here to Get Search Results !

प्रोजेक्ट निदान... ! स्तनाचा कर्करोगावर जिल्हा परिषदेचे पुढचे पाऊल स्तनाचा कर्करोग जनजागृती मोहिमेचा शुभारंभ


सोलापूर : जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग व निरामय हॉस्पिटल यांच्या संयुक्त प्रयत्नातून जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये स्तनाचा कर्करोग जनजागृती राबवण्यात येणार आहे. ही मोहीम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांची संकल्पना व मार्गदर्शनातून करण्यात येत आहे. या मोहिमेमध्ये जिल्ह्यातील २५ वर्षांवरील ०७ लाख महिलांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे.

स्तनाचा कर्करोग जनजागृती मोहिम अंतर्गत गुरूवारी, १४ मार्च रोजी दक्षिण सोलापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कंदलगाव येथे या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.



याप्रसंगी दक्षिण सोलापूरचे आ. सुभाष देशमुख, कंदलगावचे सरपंच शारदा कडते, उपसरपंच चाँद बादशाह सय्यद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) इशाधिन शेळकंदे, डॉ. फहिम गोलेवाले, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, दक्षिण सोलापूरचे गट विकास अधिकारी बाळासाहेब वाघ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. निलम घोगरे, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



स्तनाचा कर्करोग जनजागृती मोहिमेअंतर्गत निरामय संस्थेच्या प्रगतिशील ए आय तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे. दरम्यान या मोहिमेअंतर्गत महिलांची थर्मल स्क्रीनिंग करणे, सोनोग्राफी व मॅमोग्राफ उपकरणे पुरवणे, जनजागृती करणे, उपचाराकरीता पाठपुरावा करणे, तज्ञांचा सल्ला घेणे, उपचारास जिल्हा परिषद निधीमधून २० हजार रुपयांपर्यंत सहाय्य करणे या गोष्टींचा समावेश आहे.

---------------------

आज महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग याबाबत जनजागृती करणे तसेच महिलांनीही सदर आजाराविषयी न घाबरता पुढे येऊन तपासणी करून घ्यावी. या तपासणीसाठी पुरुषांनीही आजाराचे गांभीर्य लक्षात घेऊन सहकार्य करणे आवश्यक आहे. या मोहिमेला प्रोजेक्ट निदान हे नाव देण्यात आले आहे, कारण कर्करोग सारख्या आजारात लवकर निदान हाच सर्वात मोठा उपचार असतो, म्हणूनच यासाठी स्वतंत्र ॲम्बुलन्सची व्यवस्था करण्यात आली आहे.

-मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे

------------

दक्षिण सोलापूर हा तालुका कर्नाटक राज्याच्या सीमेवर असल्याने येथील आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा परिषदेने लक्ष घालून शासनाचा जास्तीत जास्त निधी उपलब्ध करुन दक्षिण सोलापूर  तालुक्याचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्नशिल रहावे, अशी अपेक्षा आहे.

-आ. सुभाष देशमुख 

----------

फोटो : 

जिल्हा परिषद अंतर्गत स्तनाचा कर्करोग जनजागृती मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी आ. सुभाष देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे, सरपंच शारदा कडते, उपसरपंच चाँदबादशहा सय्यद, डॉ. फयिन गोलेवाले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) इशाधीन शेळकंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले आदी छायाचित्रात दिसत आहेत.