सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील मौजे गावडी दारफळ येथे दिवसाढवळ्या घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केलंय. त्याच्या ताब्यातून गावडी दारफळ घरफोडीच्या गुन्ह्यातील ८, ३५, ००० रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले.
गावडी दारफळ येथे १० मार्च २०२३ रोजी दुपारच्या वेळेस अज्ञात चोरट्याने दोन बंद घराचे कुलुप तोडुन कडी-कोयंडा उचकटून घरफोडी करुन सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ०८, ३५, ००० रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला होता. सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुरनं १५४/२३ भादवि क ४५४, ३८० प्रमाणे या गुन्ह्याची नोंद होती. पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक यांनी घटनास्थळी भेट देऊन या घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन गुन्हा उघड करण्यासंबंधी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांना आदेशीत केले होते.
त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील सपोनि धनंजय पोरे, पथकातील अंमलदार यांना गुन्हे उघड करण्यासंबंधी तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेण्याकामी सूचित केले होते. सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेता गुन्हा त्वरीत उघडकीस आणने करीता सदरचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता.
पोलीस उप-निरीक्षक राजु डांगे यांचेकडे या गुन्हयाचा तपास देण्यात आला होता. पोलीस उप-निरीक्षक डांगे यांनी तपासादरम्यान रेकॉर्डवरील दिवसा घरफोडी करणाऱ्या अटक आरोपींचे अभिलेख पडताळणी केली असता, खबरीमार्फत मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार हा गुन्हा लातूर येथील गुन्हे अभिलेखावरील आरोपीनं केल्याची माहिती मिळाली. नुसार १२ मार्च रोजी आरोपीस अटक करण्यात आली. न्यायालयाने त्या आरोपीस १६ मार्च रोजीपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली होती.
त्या आरोपीकडं कसून सखोल तपास करता, त्याने गावडी दारफळ येथील घरफोडीच्या गुन्हे साथीदारांसोबत केल्याची कबुली दिली. त्या गुन्ह्यात चोरीस गेलेले ०८, ३५, ००० रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. आरोपीचा गुन्हे अभीलेख पाहता, त्याच्यावर पिंपरी चिंचवड, लातूर, कर्नाटक मध्ये बिदर, हुमनाबाद येथे घर फोडीचे २० गुन्हे दाखल असल्याचेही निष्पन्न झालं आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक आर.एल डांगे या गुन्ह्याचा पुढील तपास करीत असून आरोपी सध्या न्यायालयील कोठडीत आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर (स्थानिक गुन्हे शाखा), यांच्या नेतृत्वाखाली सहा.पोलीस निरीक्षक धनंजय पोरे, सपोनि सत्यजीत आवटे व पोलीस उप-निरीक्षक सुरज निंबाळकर, पोसई राजु डांगे यांच्या पथकातील ग्रेडपोसई राजेश गायकवाड, सपोफौ महमद इसाक मुजावर श्रीकांत गायकवाड, पोहेकॉ परशुराम शिंदे, धनाजी गाडे, सलीम बागवान, विजयकुमार भरले, पोकॉ समर्थ गाजरे, विनायक घोरपडे, यश देवकाते, चापोना समीर शेख, चापोकॉ सतीश कापरे यांनी पार पाडली.